अमरावती,दि.२,: शेतकऱ्यांना आपला माल जास्तीत जास्त दिवस टिकविता यावा तसेच भाजीपाला, फळे आदी नाशवंत शेतमालाला नुकसानीपासून वाचविता यावे, यासाठी बाजार समितीमध्ये शीतगृहांची निर्मिती करीत आहोत. त्यापैकी विदर्भातील पहिले शितगृह चांदूर रेल्वे बाजार समितीमध्ये निर्माणही करण्यात आले आहे. अशा शीतगृहांचे जाळे राज्यभर विणल्या जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते धामणगांव रेल्वे येथे आयोजित महाराष्ट्र कृषि स्पर्धाक्षम प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गोदाम भूमीपुजन व शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी चांदूर रेल्वे मतदारसंघाचे आमदार विरेंद्र जगताप, बबलू देशमुख, बंडूभाऊ देशमुख, पणन संचालक तोष्णीवाल, जिल्हा उपनिबंधक भोसले आदी उपस्थित होते.
येत्या खरीपापासून शेतमाल शेतकऱ्यांना भाव नसताना विकण्याची गरज नाही. कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी तत्वावर बांधण्यात आलेले, वखार महामंडळ यांच्या गोदामांमध्ये शेतकरी आपला माल ठेवून वखार पावतीवर कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून तत्कालीन बाजारभावाच्या 80 टक्के रक्कम उचलू शकतो. तसेच चांगला भाव मिळत असल्यास गोदामातील माल विकू शकतो. त्याचप्रमाणे विदर्भातील जिल्ह्यांसाठी ठिबक सिंचन संच 75 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतीला दुग्धव्यवसाय किंवा फुलशेतीच्या व्यवसायाची जोड देण्यावर भर देताना कृषी मंत्री म्हणाले, राज्यातील बाजार समित्यांमध्ये फळबागायतदारांसाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. विदर्भात संत्रा फळपीकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन असतानाही प्रक्रिया उद्योग नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. बाजार समितीने माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. जवळपास 7 हजार जनावरे छावणीत असून 4000 टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. या संकटाचा सामना करण्याचे आव्हान राज्यासमोर उभे ठाकले आहे. शासन या दुष्काळी परिस्थितीचा धैर्याने सामना करीत आहे. कुठल्याही परिस्थितीत जनावरांना चारा व पिण्याचे पाणी कमी पडू दिल्या जाणार नसल्याची काळजी शासन घेत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
Read More →