Review Category : जमीन आणि खते

gunpatrika

मातीमध्ये अब्जावधी जिवाणू असतात आणि या जिवाणूंचा जीवनक्रमही याच मातीमध्ये पूर्ण होत असतो.
यामुळे माती सजीव आहे, असे समजले जाते. मातीचे गुणधर्म कायम होण्यामध्ये
१) हवामान, २) खडक, ३) भूपृष्ठाचा उंच-सखल भाग, ४) माती तयार होण्यासाठी लागणारा काळ आणि ५) वनस्पती, जीव, जंतू यांचा संयुक्त परिणाम असतो. या पाचही बाबी भूभागानुसार बदलत असतात. म्हणून प्रत्येक पावलागणिक मातीच्या गुणधर्मामध्ये बदल होत असतो. उदा. बेसॉल्ट खडकातील खनिजे अल्कली धर्मी असल्यामुळे बेसॉल्ट या काळ्या खडकापासून तयार झालेला जमिनीचा सामू (पीएच) ७.० च्या वर असतो. हा खडक अत्यंत लहान कणांनी तयार झालेला असल्यामुळे मराठवाड्याच्या मातीमध्ये चिकण मातीच्या कणांचे प्रमाण जास्त (सरासरी ३० टक्क्यांपेक्षा जास्त) आढळते. म्हणून या जमिनी भिजल्यानंतर चिकट होतात. त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते व रंगाने काळ्या किंवा गर्द तपकिरी दिसतात. कुजलेले सेंद्रिय पदार्थ, टिऍनियम व लोह यांच्या संयुगाने मातीला गर्द रंग प्राप्त होतो.

जमिनीची खोली आणि पिकांचे नियोजन
जमिनीची खोली वेगवेगळी असते. जमिनीच्या खोलीनुसार पिकांचे नियोजन केल्याने उत्पादन चांगले येते आणि खर्चही कमी होतो. म्हणून जमिनीच्या खोलीनुसार योग्य अशा पिकांची लागवड करावी. सोटमूळ असलेली कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन यांसारखी पिके खोल ते मध्यम काळ्या जमिनीमध्ये चांगली येतात. तृणधान्यांची पिके उथळ जमिनीमध्येही चांगली येतात. फळ पिकांसाठी मध्यम, खोल आणि निचरा होणारी जमीन निवडावी. सध्या बाजारभावाला अनुसरून पिकांची निवड होत असल्याने जमिनीच्या खोलीनुसार पिके घेतली जात नाहीत. यामुळे उत्पादनात चढ-उतार होण्याची शक्यता असते. जमिनीचे आरोग्य बिघडण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरताना दिसते. हलक्या जमिनीमध्ये खादाड पिके घेतल्याने जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम होतो. कपाशीसारख्या पिकांचे उथळ हलक्या जमिनीमध्ये योग्य तेवढे उत्पादन मिळत नाही. यामुळे शेतकर्‍यांचे आणि पर्यायाने शेतजमिनीचेही नुकसान होते. अशा वेळी जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे जरूरीचे असते.
Untitled-4

जमिनीच्या आरोग्याची कल्पना
जमिनीच्या आरोग्याची सांगड जमिनीच्या गुणधर्माशी जोडलेली असते. जमिनीचा सामू हा ६.५० ते ७.५० च्या दरम्यान, क्षारांचे कमी प्रमाण, सेंद्रिय कर्ब १ टक्क्यापेक्षा जास्त, चुनखडीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी, १ चौ. मी. जमिनीमध्ये कमीत कमी एक गांडूळ, पाण्याचा निचरा होणारी, क्षारयुक्त किंवा चोपण नसलेली, योग्य त्या सर्व अन्नद्रव्यांचा समतोलपणे पुरवठा करणारी, पाणी आणि हवेचे योग्य प्रमाण असणारी, भरपूर जिवाणूंनीयुक्त असलेली जमीन म्हणजे चांगली आरोग्य असलेली जमीन असते. या प्रकारचे गुणधर्म असणार्‍या जमिनीचे क्षेत्र अत्यंत कमी होत आहे. मानवी हव्यासाने जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.

जमिनीच्या आरोग्याची समस्या
मध्यम काळ्या आणि हलक्या जमिनीची धूप होत आहे. अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला उपसा आणि सेंद्रिय कर्बाचे घटत जाणारे प्रमाण या मुख्य समस्याने जमीन ग्रासली आहे. या समस्यांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मृदसंवर्धनाची कामे (बांधबंधिस्ती) केल्याने माती वाहून जाणार नाही आणि जमिनीमध्ये पाणी झिरपेल. मृदसंधारणाची कामे झाल्यावर शेतकर्‍यांनी कामाची निगा ठेवणे आवश्यक आहे. मृदसंधारणाची कामे होत असताना प्रत्यक्ष हजर राहून शेतीचा चढ-उतार, उंच-सखल भाग या विषयांची माहिती मृदसंधारणाची कामे करणार्‍यास सांगितली तर मृदसंधारण चांगल्या प्रकारे होईल. मातीचा वरच्या थरात (मातीचे फूल) सेंद्रिय कर्बाचे आणि उपयोगी जिवाणूंचे प्रमाण सर्वाधिक असते. यासाठी त्याची जपवणूक होणे आवश्यक असून, त्यामुळे निसर्गसंवर्धनदेखील होते. मृदसंधारणामुळे पिकांना लागणार्‍या पोषक अन्नद्रव्यांच्या र्‍हासाला अटकाव घालता येतो.

सामूचे बिघडते प्रमाण
मराठवाड्यातील जमिनी अल्कलीधर्मी असून, त्यामध्ये सामूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सामू ७.५ च्या वर गेल्यामुळे नत्र, तांबे, स्फूरद, बोरॉन, जस्त, लोह व मॅगनीज अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान ठेवणे आवश्यक आहे. सेंद्रिय खते उदा. शेणखत, गांडूळ खत, कम्पोस्ट खत याचा हेक्टरी ५ टन या प्रमाणात वापर केल्याने सामू नियंत्रणात राहतो. सोबतच पाण्याचा योग्य निचरा करणे आवश्यक आहे. सामू जर ८.५ च्या वर असेल तर हेक्टरी ३ टन जिप्सम वापरल्याने आणि योग्य निचर्‍याची व्यवस्था केल्याने जमिनीचे आरोग्य चांगले राहते.

पोषक अन्नद्रव्यांचा र्‍हास/उपसा
अन्नद्रव्यांच्या र्‍हासाला अनेक घटक कारणीभूत आहेत. यात प्रामुख्याने १) माती वाहून गेल्याने (धूप) त्याबरोबर वाहून जाणारे अन्नद्रव्ये, २) जास्त पाण्यामुळे जमिनीच्या उपजाऊ थरातील अन्नद्रव्य पाण्याद्वारे खालच्या थरात जाऊन तेथून भूगर्भातील पाण्यात वाहून जाणे (त्यामुळे पाणीही दूषित होते.), ३) जास्त तापमानामुळे आणि हवेमुळे पाण्याच्या वाफेद्वारे अन्नद्रव्यांचा र्‍हास, ४) खादाड पिके आणि पीक पद्धतींमुळे अन्नद्रव्यांचा उपसा आणि त्या बदल्यात पिकांना खताद्वारे कमी अन्नद्रव्ये पुरवठा ही कारणे आहेत. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी सरासरीचा विचार केला तर जवळपास ११७ किलो खते दिली जातात आणि १८९ किलो अन्नद्रव्ये पिके शोषण करतात. याचाच अर्थ दरवर्षी एका हेक्टरमधून ७२ किलो अन्नद्रव्यांचा आगाऊ उपसा होत आहे. अशा प्रकारे अन्नद्रव्यांचे प्रमाण घटत चालले तर या सुजलाम सुफलाम जमिनीचे वाळवंट होण्यास विलंब लागणार नाही.

अन्नद्रव्यांची कमतरता
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये नत्र, स्फूरद, गंधक, जस्त, लोह आणि बोरॉनची कमतरता दिसून येते.
नत्र – ७० ते १०० टक्के
स्फूरद – ८० ते १०० टक्के
गंधक – ३४ ते ३६ टक्के
जस्त – ३६ टक्के
लोह – २६ टक्के
बोरॉन – ३७ टक्के

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाय
* कमी मशागत व सपाटीकरण करावे.
* मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी.
* आंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
* जमिनीवर आच्छादनाचा (उसाचे पाचट, गव्हाचा भुसा) वापर करावा.
* पिकांचे अवशेष (पिकांचा १/३ भाग) न जाळता जमिनीत गाडावेत.
* पिकांचे अवशेष कुजवण्याकरिता ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करावा.
* भर खतांचा (शेणखत/कम्पोेस्ट/गांडूळखत) नियमित वापर करावा.
* हिरवळीच्या खतांचा (बरू, धैंचा, गिरीपुष्प) नियमित वापर करावा.
* शेताच्या बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प व हिरवळीची पिके लावावीत.
* शेतीची पशुधन संगोपनाशी सांगड घालावी.

सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढविणे आवश्यक
सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या आरोग्याचा आधारस्तंभ आहे. सेंद्रिय पदार्थाचे घटत जाणारे प्रमाण (सेंद्रिय कर्ब) याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिवसेंदिवस जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. सर्वसाधारणपणे मातीमध्ये १ टक्का किंवा त्याहून जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असायला हवे. सेंद्रिय पदार्थ हे जमिनीतील जिवाणूंचे अन्न आहे. पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यासाठी जिवाणूंची गरज असते. सेंद्रिय पदार्थाची जलधारण शक्ती जास्त असल्यामुळे सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनी पाणी जास्त काळ शोषून ठेवतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आणि इतर पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय पदार्थामधून होत असतो. मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. सध्या प्रचलित कृषिसंधारण तर्कानुसार आणि १८४० मध्ये लिबिग या जर्मन वैज्ञानिकाने सांगितल्याप्रमाणे जमिनीतून जे काही उत्पादन मिळते त्याचा १/३ भाग जमिनीस परत केला पाहिजे. तो जमिनीचा हक्क असून, त्यामुळे जमिनीचे आरोग्य अबाधित राहील आणि ती चिरस्थायी उत्पादनक्षम राहील.*

डॉ . हरिहर कौसडीकर
डॉ .सुरेश वाईकर
(लेखक हे परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत.)

Read More →

सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यावरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. विशेषतः जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या, त्यांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्धता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीच्या कणांची रचना इत्यादी अनेक भौतिक व रासायनिक गुणधर्म सेंद्रिय कर्बाशी निगडित आहेत. सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपलब्ध परिस्थितीत व साधनसामग्रीनुसार कोणत्याही पद्धतीने शेतजमिनीस सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

Read More →

कडधान्य पिकांच्या मुळावर सूक्ष्म जिवाणूच्या गाठीमुळे हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर केले जातो व जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. या पिकांची मुळे खोलवर पसरून खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून ते वरच्या थरात उपलब्ध स्थितीत आणून सोडतात. ही पिके जमिनीवर पसरलेल्या स्थितीत वाढून जमीन जास्तीत जास्त झाकतात. त्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण होते. या सर्व घटकांव्यतिरिक्त कडधान्य पिकांचे उत्पादनही मिळते आणि जमिनीची सुपीकता व उत्पादकतादेखील वाढते. मानव, पशुधन व जमिनीच्या आरोग्यासाठी कडधान्य पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Read More →

jameen ani khate logoखतनिर्मितीचा खर्च वाढत असल्याने रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. छोट्या व जिरायत शेतकर्‍यांसाठी खतांच्या वाढत्या किमती हा चिंतेचा विषय बनला आहे. प्रतिकूल परिस्थितीत रासायनिक खतांवरील खर्चाचा किफायतशीर मोबदला मिळावा म्हणून या खतांचा अपव्यय न होता त्याचा परिपूर्ण कार्यक्षम वापर कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे.

Read More →

jameen ani khate logoमाती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांची माहिती मिळते. या तिन्ही गुणधर्मांची माहिती खत व्यवस्थापनासाठी उपयोगी पडते. पिकांचे प्रतिहेक्टर उत्पादन वाढवायचे असेल तर सध्याच्या खते वापरण्याच्या पद्धती व प्रमाण यात बदल करणेे आवश्यक आहे व ती काळाची गरज आहे.

Read More →

नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत उपयुक्त असलेल्या निळ्या-हिरव्या शेवाळीच्या जातीमध्ये ऍनबिना, नोस्टोक, कॅलथ्रिक्स, प्लोटोनेमा, टॉलिपोथ्रिक्स, सायटोनेमा, ऍलोसिरा आणि बेस्टीलॉपसिसचा अंतर्भाव होतो. योग्य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतिहेक्टरी ३० कि. ग्रॅ. नत्र स्थिर करू शकते.

Read More →