चारा बनविण्याचे यंत्र

पाऊसमान कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी चारा आणि पाणीटंचाई निर्माण झालीय. पशुपालकांना जनावरे सांभाळणे अवघड बनलेय. त्यामुळे अनेकांनी त्यांना बाजार दाखवायचा पर्याय निवडला आहे. ज्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलाय, तिथे चारा पिकांची लागवड करण्याकडे भर देण्यात येणार आहे. पण तसे करण्यासाठी शेतकर्‍यांपुढे पाणी आणि जमिनीच्या अडचणी आहेत. शिवाय इतके करूनही चारा पिके उगवण्यास किमान दोन महिन्यांचा तरी अवधी लागणार आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी जागेत, कमी पाण्यात आठ दिवसात चारा तयार करता येतो. मोठ्या प्रमाणावर दुध-दुभते असणार्‍या शेतकर्‍यांना हा पर्याय अगदी उपयोगी आहे.

कमी जागेत, कमी पाण्यात यंत्राने हिरवा चारा तयार करता येतो का? उत्तर आहे, येतो. मातीविना शेतीचे (हायड्रोपोनिक) तंत्र वापरून नियंत्रित वातावणात अशी चारा निर्मिती होऊ शकते. शेतकर्‍याकडील पशूधनाला, वर्षभर, दररोज ताजे हिरवे खाद्य देण्यासाठी, हा अतिशय सक्षम आणि सहज परवडणारा खाद्य उपाय आहे. ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर पशूधन आहे आणि ज्यांना दररोज हिरवा चारा देण्यासाठी बाजारपेठेच्या पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते त्यांच्यासाठी ‘चारा यंत्राचा’ (फॉडर मशीन) पर्याय उत्तम आहे. औरंगाबाद येथील सुपर क्रिटीकल रिऍक्टरर्स ऍन्ड प्रोसेसर्स कंपनीचे संचालक सुनील कुलकर्णी सध्या या यंत्रावर काम करत आहेत. त्यामुळे पशूखाद्यावरील खर्च ५०% पर्यंत खाली येऊ शकतो. शिवाय हवामान परिस्थिती कशीही असली तरीही वर्षातील १२ही महिने हिरवे खाद्य मिळण्याची खात्री. हे तंत्रज्ञान वपरण्यासाठी कमी खर्च आणि कमी श्रमबळ लागते. हिरवा चारा काढण्यास आणि लावण्यास दररोज ३० मिनिटे ते १२० मिनिटे लागतात. या पद्धतीने उगवलेले मक्याचे किंवा गव्हाचे पोषक खाद्य पशू आवडीने खातात. या खाद्यात योग्य प्रमाणात आर्द्रता असते, पशूंच्या कोलिकमुळे होणारा मृत्यू टाळण्यास यामुळे मदत होते.

या यंत्राबद्दल सुनील कुलकर्णींशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘ तसे हे तंत्रज्ञान नवे नाही. १९७० पासून वापरात आहे. जपान आणि चीन याबाबतीत आघाडीवर आहेत. आपल्याला धान्याला मोड आणायचे असतील, तर आपण ते १० ते १२ तास बांधून ठेवतो. त्यानंतर त्याला मोड येतात. अगदी तेच तंत्र या प्रकारात आहे, फक्त त्यात प्रकाशसंश्‍लेषणाचा वेग वाढविण्यासाठी थोड्या सुधारणा करून या यंत्रात त्याचा वापर करण्यात आला आहे. एका ट्रेमध्ये आवश्यकते नुसार धान्य-कडधान्य टाकायचे. त्यानंतर असे ट्रे कपाटाच्या आकाराच्या या यंत्रात ठेवून देतात. त्याला पूर्व निर्धारित वेळेनुसार स्प्रेने वरुन पाणी दिले जाते. खाद्याची उत्तम वाढ व्हावी आणि त्यात उच्चतम पोषण मूल्य असावे यासाठी ही रोपे वाढवण्याच्या चेंबरमध्ये तापमान नियंत्रित केले जाते. साधारणत: आठ दिवसात एक किलो धान्यापासून सात ते आठ किलो चारा तयार होतो. त्यासाठी दिवसाला केवळ ७० लिटर पाणी लागते. सुमारे साडेचारशे घनमीटर जागेत ही कपाटवजा यंत्रणा बसवता येते आणि दररोज १०० किलो चारा उपलब्ध होऊ शकतो.’’

कुलकर्णी माहिती देत असतानाच एक प्रश्‍न पडला तो म्हणजे चारा तर शेतातही उगवता येतो, मग त्यासाठी हे यंत्र कशाला पाहिजे? त्यावर ते म्हणाले की तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. पण शेतात मका लागवड करून त्यासारखा चारा तयार करायचा असेल, तर लागवडीचे अंतर लक्षात घेता किमान दीड एकर जमिन लागते. एवढ्या जमिनीत शेतकरी दुसरे पिक घेऊ शकेल. शिवाय असा चारा तयार होण्यासाठी किमान ६० दिवसांचा कालावधी पाहिजेच. एकदा का हा चारा तयार झाला की तो काही दिवसच टिकतो. मात्र हायड्रोपोनिकच्या तंत्राने दररोज हिरवा चारा उपलब्ध होतो आणि त्यासाठी जागाही कमी लागते. ज्यांच्याकडे जमिन नाही त्यांच्या गोठ्यातही हे यंत्र बसवता येते. प्रकाशसंश्‍लेषणासाठी योग्य ती सोय असल्याने उन्हाची किंवा विशिष्ट हवामानाची गरज पाहिजेच असे नाही.
हायड्रोपॉनिकच्या या तंत्रानुसार केवळ पाण्याच्या साह्याने बियाणांना मोड आणले जातात आणि पाण्यावरच त्यांचे पोषण होते. सात ते आठ इंच उंचीपर्यंत वाढ होण्यासाठी पाण्यातील घटक पुरेसे असतात. त्यासाठी अतिरिक्त खत, किटकनाशक, माती वगैरेंची गरज पडत नाही. त्यामुळे या तंत्रापासून तयार झालेला चारा हा पूर्णत: सेंद्रिय चारा असतो. गाय, म्हशी, मेंढी, कोंबडी, ससे, घोडे यांचे फार्म आणि प्रजनन स्थानके, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, इतर पशू मालक सक्षमतेने हायड्रोपोनिक हरित कक्ष वापरू शकतात. याशिवाय, आयुर्वेदिक औषध आणि उपचार म्हणून मोठी मागणी असलेले तृण रस काढण्यासाठी आवश्यक हिरवेगार गव्हाचे आणि जवाचे तृण उत्पादनासाठीही ही प्रणाली सक्षमतेने वापरली जाऊ शकते. साडेचारशे घनमीटर आकाराच्या एका यंत्रणेत ८६ ट्रे बसतात. त्यापैकी दररोज ११ ट्रे धान्याने (बियाणाने) भरावे लागतात. त्यासाठी साधारणत: १६ किलो बियाण्यांची आवश्यकता असते. दररोज १०० किलोग्रॅम चारा मिळविण्यासाठी साडेचारशे घनमीटर आकाराचे यंत्र बसवावे लागते, त्यासाठी साधारणत: दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जर पशुपालकाला जास्तीचा चारा पाहिजे असल्यास त्या पटीत मोठे यंत्र तयार करता येते.

सध्या चार्‍याचे दर बाजारात २० रुपये किलो पर्यत पोचले आहेत. काही ठिकाणी हेच दर ३० रुपये प्रतीकिलोपेक्षाही जास्त आहेत. शिवाय हा विकतचा चारा पाहिजे तेव्हा, आपल्या जवळ मिळेलच याची खात्रीही नसते. अनेकदा शेतकर्‍याला २० ते ५० किलोमीटरपर्यंत चार्‍यासाठी जावे लागते. याचाच अर्थ चार्‍याच्या खर्चात वाहतुकीचाही खर्च वाढतो. पण या तुलनेत यंत्राने तयार झालेला चारा सुलभ आणि सहज उपलब्ध होतो. पैशांच्या हिशेबात सांगायचे झाले, तर केवळ अडीच ते तीन रुपये एक किलो चार्‍यासाठी खर्च होतात. शिवाय या तंत्राने तयार झालेली मोड आलेली गादी पूर्णपणे खाण्यास योग्य आणि अतिशय पोषक असते. पशू ही पूर्ण गादी, मुळे आणि हिरवा भाग खातात त्यामुळे काहीही वाया जात नाही. गहू, मका, बार्ली, ओट याशिवाय मूग, उडीद अशा बियांची लागवड करून शेतकरी या यंत्राद्वारे आवश्यकतेप्रमाणे चारा मिळवू शकतात.

सध्या हे यंत्र लवकरच पाबळच्या विज्ञान आश्रमात बसविण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांकडेही हे यंत्र बसविले जाणार आहे. एरवी परदेशी बनावटीची यंत्र विकत घेतल्यास त्यांचा किमान खर्च साडेचार लाखापर्यंत जातो. मात्र हे यंत्र भारतीय बनावटीनुसार किमान खर्चात शेतकर्‍यांना उपलब्ध होणा असल्याचे सुनील कुलकर्णी सांगतात.

अधिक माहितीसाठी संपर्क
सुनील कुलकर्णी, औरंगाबाद
मोबाईल : ०९८२२९१११६०,
दूरध्वनी क्रमांक : ०२४०-६६०१९९०
————

असे आहे चारा यंत्र

झाडे वाढविण्याच्या विशिष्ट ट्रे मध्ये निवडलेले धान्य किंवा कडधान्य पसरून त्याला पूर्व निर्धारित वेळेनुसार स्प्रेने वरुन पाणी दिले जाते. खाद्याची उत्तम वाढ व्हावी आणि त्यात उच्चतम पोषण मूल्य असावे यासाठी ही जाडे वाढवण्याच्या चेंबरमध्ये एक तापमान सेट करून ते राखले जाते. चारा उगवल्यानंतर ट्रे मधून फक्त सरकवून काढून घेता येतो. नंतर तोच ट्रे धूवून, त्यात पुन्हा बिया घालून या प्रणालीच्या दुसर्‍या बाजूने आत सरकवता. ही यंत्रणा बाहेरही वापरली जाऊ शकते पण शेडमध्ये किंवा उन्हाळ्यात थेट सूर्य प्रकाश नसताना ही यंत्रणा कमी खर्चात काम करते. या यंत्रासाठी फक्त सिंगल फेज १५ ऍम्पियरचा विद्युत पुरवठा लागतो. त्यामुळे वीजेच्या खर्चासह दिवसाला ४० पेक्षा जास्त खर्च येत नाही. आवश्यकतेनुसार सौर ऊर्जवरही ही यंत्रणा चालते.

चारा यंत्राचे फायदे
कमी जागेत मोठे उत्पादन
ट्रॅक्टर किंवा महागड्या उपकरणांची गरज नाही.
पारंपारिक सिंचन पद्ध्तीपेक्षा खूप कमी पाणी लागते.
कुशल कामगारांची गरज नाही, अकुशल कामगारही यंत्रणा हाताळू शकतात.
फार श्रम लागत नाही.
खाद्य उगवण्यापूर्वी पाऊस किंवा खतांची गरज नाही.
मर्यादित पाणी असल्यास दुष्काळावर मात
वर्षातील ३६५ दिवस खाद्य तयार केले जाऊ शकते.
व्यावसायिकदृष्ट्याही चारा तयार करून विकता येतो.
—————-

 पंकज जोशी

 

 

About the author  ⁄ admin

3 Comments

  • Reply
    Dr Gaikwad
    November 8, 2012

    very good concept we want to see this machine

    • Reply
      admin Author
      November 8, 2012

      Thank you Sir, For this Kindly contact Mr. Suneel Kulkarni. you can see this machine at Vidnyan Ashram Pabal (Pune)

  • Reply
    sandipan
    March 10, 2013

    very good concept to livestock farming …..

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)