‘ऑक्सिटोसीन’चा वापर कितपत योग्य?

गायी-म्हशींनी जास्त दूध द्यावे, यासाठी ‘ऑक्सिटोसीन’ हे रसायन त्यांना इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जाते. मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या या रसायनाचा गैरवापर करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. विदर्भात काही दिवसांपूर्वी ‘ऑक्सिटोसीन’चा मोठा साठा जप्त करण्यात आला. दुभत्या जनावरांना देण्यात येणार्‍या या घातक रसायनाविषयीची माहिती या लेखात जाणून घेऊया…

‘ऑक्सिटोसीन’ हे गायींच्या किंवा कोणत्याही सस्तन प्राण्यांच्या मादीच्या मेंदूच्या तळाशी स्थित असलेल्या पीयूषीका ग्रंथीचा स्राव आहे. ऑक्सिटोसीन विशिष्ट परिस्थितीतच स्त्रवल्या जाते. उदा. जेव्हा दूध काढण्याची वेळ होते तेव्हा मादीला विशिष्ट संवेदना होतात. जेव्हा दूध काढण्याची तयारी सुरू होते. जसे गायीला आंघोळ घालण्यात येते, तिच्या पुढ्यात खाद्य ठेवण्यात येते, दूध काढण्याच्या भांड्याचा खडखडाट सुरू होतो आणि सर्वांत मुख्य म्हणजे, गाईस तिच्या वासराचे दर्शन होते तेव्हा त्या फक्त दर्शनाने तिला प्रेमाचे भरते येते. जेव्हा ते शेपटी उंचावून उड्या मारत धावत येऊन गाईस बिलगते आणि त्याच्या कोमल ओठांचा स्पर्श गायीच्या सडास होतो तेव्हा या सर्व संवेदना गायीच्या शरीरातील मज्जातंतूद्वारे तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतात. असे झाल्यावर त्या संवेदनांचा प्रतिसाद म्हणून मेंदू त्याच्या तळाशी असलेल्या पीयूषिका ग्रंथीला आदेश देतो की, ऑक्सिटोसीन नावाचे संप्रेरक रक्तात सोडा. या आदेशान्वये ऑक्सिटोसीन संप्रेरक रक्तात स्त्रवले जाते आणि ते रक्तवाहिन्यांमधून वाहत जाऊन हातळातील ऍल्व्हीओलाय नावाच्या पेशींमध्ये त्यात दूध थेंबाथेंबाने तयार होत असते. त्यांच्यावर स्थित असलेल्या स्नाय्वीक पेशींपर्यंत पोहोचून पिळण्याची प्रक्रिया घडवून आणते. यामुळे ऍल्व्हीओलाय पेशी पिळल्या जातात आणि त्यातील दूध हातळातील पेशी पिशवीत आणि तेथून सडात येते आणि सडाच्या आत असलेल्या बारीक नळीतून बाहेर पडते. यावरून गायीच्या सडातून दूध बाहेर पडण्याची प्रक्रिया किती गुंतागुंतीची आहे, याची खात्री पटते; परंतु बर्‍याचदा गाय काही कारणास्तव जसे कुत्री भुंकली किंवा साप दिसला किंवा इतर काही कारणास्तव घाबरली किंवा तिला धक्काबुक्की अथवा मारहाण केल्याने ती रागावली तर अशा परिस्थितीत तिच्या मेंदूकडे त्या संवेदना जातात आणि मग मेंदू आदेश देतो की, ऑक्सिटोसीनचे स्त्रवण बंद करा किंवा कमी करा. यानंतर तो आदेश देतो की, किडनीच्या जवळ स्थित असलेल्या ऍड्रीनल ग्रंथीमधून ऍनीड्रेनॅलीन नावाचे दुसरे संप्रेरकाचे स्त्रवण करा. या संप्रेरकाच्या स्त्रवणामुळे ऑक्सिटोसीनचे स्त्रवण रोखल्या जाते आणि गाईस पान्हा फुटत नाही. मग लोक म्हणतात की, गायीने पान्हा चोरला. अशा परिस्थितीत गायीच्या सडातून दूध बाहेर येणे बंद होते. अशा परिस्थितीत गायीला थोडा वेळ देऊन तिला प्रेमाने गोंजारून शांत करायला पाहिजे. जेणेकरून तिची मानसिक स्थिती चांगली होईल आणि परत एकदा ऑक्सिटोसीनचे स्त्रवण सामान्यपणे होण्यास सुरवात होते; परंतु एवढा संयम आणि वेळ काही लोकांजवळ नसतो. मग ते शॉर्टकट वापरतात, तो म्हणजे कृत्रीम पद्धतीने तयार केलेल्या ऑक्सिटोसीन संप्रेरकाचे इंजेक्शन वापरणे होय. हे इंजेक्शन गायीच्या मानेवर स्नायूंमध्ये टोचतात. ते दिल्यावर गाईस थोडा फार पान्हा फुटतो आणि गवळी तिचे दूध काढतो. काही गवळी तर वेगवेगळ्या गिर्‍हाईकांना वेगवेगळ्या वेळी पाहिजे तेवढे दूध दोहून देण्यासाठी अनेकदा गाईस किंवा म्हशीस हे इंजेक्शन टोचतात. हा अत्यंत अघोरी आणि बेकायदेशीर प्रकार आहे.

ऑक्सिटोसीनचे सडातून दूध काढण्यास मदत करणे हे काही एकच कार्य नाही. जेव्हा गायीचा वळूशी नैसर्गिक पद्धतीने समागम होतो, तेव्हा शुक्राणू गायीच्या प्रजनन अंगात स्थित असलेल्या गर्भाशयात पोहोचवण्यासाठीसुद्धा ऑक्सिटोसीन स्त्रवल्या जाते आणि त्याच्या क्रियेमुळे गर्भाशय आकुंचन पावते. ज्यामुळे शुक्राणू समोर ढकलले जातात आणि व्यवस्थितपणे गर्भाशयाजवळ पोहोचून स्त्रीबिजाशी त्याचे मीलन होते आणि मग भ्रूण तयार होते, जे वासरू म्हणून २८० दिवसांनी जन्मास येते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, काही सेंटिमीटर आकार असलेल्या प्रजनन मार्गातून १० ते २० किलो शरीर वजन असलेले वासरू जन्मास येते, तेव्हा पण ऑक्सिटोसीन स्त्रवले जाते आणि गर्भाशयाचे आकुंचन व प्रसरण तालबद्धरीतीने होत राहते. त्यामुळे वासरू पोहळणार्‍या व्यक्तीच्या स्थितीत हळूहळू योनीद्वाराकडे ढकलले जाते आणि नैसर्गिकरीत्या सामान्य प्रसवक्रिया संपन्न होते. याचा अर्थ असा की, ऑक्सिटोसीनची क्रिया गायीच्या शरीराच्या आत स्थित असलेल्या प्रजनन अंगावरही होते आणि ऑक्सिटोसीनच्या सतत वापरामुळे विपरीत परिणाम होऊन गाय किंवा मादी कालांतराने वांझ होते, तर आपण विचार करावा की, नेहमी अनेकदा ऑक्सिटोसीनचे कृत्रिम इंजेक्शन देणे कितपत योग्य आहे, या प्रश्‍नाचे उत्तर सर्वथा नाही, हेच आहे.

ऑक्सिटोसीनचा वापर फक्त विशेष परिस्थितीत गायीला काही कारणास्तव पान्हा अडला तर मोकळा करण्यासाठी किंवा तिच्या प्रसवक्रियेत अडथळा निर्माण झाला असेल तेव्हाच ङ्गक्त तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या उपस्थितीत त्याच्या सल्ल्यानुसार ठराविक डोजमध्येच करणे योग्य असते; अन्यथा नाही.

आता दुग्ध व्यावसायिकांनी हा प्रश्‍न अनेकदा उपस्थित केला आहे की, आमची गाय किंवा म्हैस दोहायला जड आहे आणि ती दूध देण्यास त्रास देते, तर या प्रश्‍नाचे उत्तर खालीलप्रमाणे आहे.

गायीला काहीतरी सुंदर असे नाव ठेवावे आणि सर्वार्ंनी तिला प्रेमाने त्या नावाने बोलवावे. तिला दूध काढण्याआधी थंडगार पाण्याने आंघोळ घालावी. नंतर तिला गोंजारावे, चारा घालावा, वासराला सुरवातीच्या धारा पिऊ द्याव्यात, म्हणजे गाईस व्यवस्थित पान्हा फुटेल. कृत्रिम पद्धतीने गोपालन करीत असल्यास किंवा वासरू नसल्यास गवळ्याने गायीच्या हातळास आणि सडांना बोटांनी हळूवारपणे मालिश करावी. यामुळे देखील पान्हा फुटण्यास मदत होते. गाईस जोरात थाप मारू नये, धक्काबुक्की करू नये, गोंधळ किंवा घाई करू नये, तिला दूध काढताना तोंडाने आवाज करून पुचकारावे. मध्येच धारा कमी आल्यास किंवा धारा येणे बंद झाल्यास थांबावे. धीर धरावा, गाईस परत गोंजारावे आणि तिला थोडा वेळ द्यावा, त्यामुळे परत संप्रेरकाचे स्त्रवण सुरू होईल. दूध सात ते दहा मिनिटांतच काढावे; कारण ऑक्सिटोसीन संप्रेरकाचा प्रभाव एवढाच वेळ टिकतो. जास्त दूध देणार्‍या गायीचे दूध दोन गवळ्याकडून एकाचवेळी काढावे. दूध पूर्णपणे काढावे म्हणजे जेव्हा सडातून दूध बाहेर येणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हापर्यंत दूध काढावे; अन्यथा हातळात शिल्लक असलेले दूध परत शरीरात शोषले जाऊन वाया जाते आणि गवळ्याचे आर्थिक नुकसान होते. दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात. समजा सकाळी सात आणि सायंकाळी सात अशा वेळा असतील तर जेव्हापर्यंत गाय दूध देईल तेवढी वर्षे त्याच वेळेला दूध काढावे. दूध काढणार्‍या गवळ्यास शक्यतो बदलू नये, अन्यथा दूध कमी मिळते; कारण गाईस स्पर्शाची भाषा चांगलीच समजते आणि त्यानुसार तिच्या शरीरात ऑक्सिटोसीनचे स्त्रवण कमी-जास्त होत राहते. मशीनने दूध काढण्याआधी गाईस नीट पान्हावून घ्यावे आणि सरते शेवटी हातळात शिल्लक असलेले चिमटी पद्धतीने हळूवारपणे पटापट काढून घ्यावे. दूध दोहण्याच्या वेळेमध्ये समान अंतर ठेवावे. दोनदा दूध काढायचे असल्यास दोन काढणीत १२ तासांपेक्षा जास्त अंतर असू नये आणि जास्त दूध देणार्‍या गायींचे तीनदा दूध काढायचे झाल्यास ८ तासांपेक्षा जास्त अंतर असू नये.

गाय किंवा म्हैस ही यंत्रे नाहीत, ते जीव आहेत. त्यांनाही भावना असतात. त्यांनाही राग येतो, भीती वाटते आणि हे सर्व बदल त्यांच्या शरीरातील संप्रेरकाच्या प्रभावाने होतात म्हणून त्यांना प्रेमाची वागणूक देऊन त्यांची मानसिक स्थिती चांगली ठेवावी. रसायने मग ते कृत्रिम ऑक्सिटोसीन का असेना, त्याचा अवाजवी गैरवापर सर्वथा अयोग्यच आहे.

मग बिना पैशांचा साधा उपाय एकच आहे, तो म्हणजे प्रेम गाईस गोमाता/देव समजा आणि तिच्यावर प्रेम करा. प्रेमाने वागवा म्हणजे सर्व प्रश्‍न निकालास लागतील. जुने ते सोने ही म्हण या ठिकाणी सयुक्तिक वाटते.
- डॉ. सुनील रोकडे
प्रमुख शास्त्रज्ञ (पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन), कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर

About the author  ⁄ kalindi

One Comment

  • Reply
    dr Londhe Sanjay Mukundrao
    February 5, 2013

    सर्वांगसुंदर आधुनिक किसान ची जळगाव येथे भेटला आणि लगेच मैत्री झाली.बळीराजाला एक सच्चा साथी मिळाला.आधुनिक किसान टीमला माझह हार्डी शुभेच्या.

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)