आल्यापासून करा तेलाची निर्मिती

अलिकडे अनेक शेतकरी आल्याची (अद्रक) लागवड करून चांगले उत्पादनही घेत आहेत. साधारणत: तीन चार वर्षांपूर्वी काही शेतकर्‍यांना आले लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळाले. त्यामुळे बरेच शेतकरी या उत्पादनाकडे वळाले. परिणामी, उत्पादन वाढले आणि आल्याची किंमत घसरली. शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले. असे घडू नये, यासाठी आल्यावरील प्रक्रियेचा विचार करणे गरजेचे आहे. आल्यापासून तेल तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग त्यापैकीच एक आहे.

मसाला म्हणून सामान्यपणे वापरात असलेले ‘आले’ भारतीय मुळाचे आहे. भारत आणि चीनमध्ये खूप सामान्य असलेला हा मसाल्याचा पदार्थ आता जगभरात वापरला जातो. हे भारत, मलेशिया, आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज आणि विषुववृत्तावर सर्वत्र आढळते. पाचक गुणधर्मामुळे आले अनेक आशियाई पदार्थांचा अविभाज्य घटक आहे. आल्याचे मूळ आणि आल्याचे तेल परीरक्षक आणि स्वाद देणारा पदार्थ म्हणून वापरले जाते.

सुंठ, आल्याच्या वड्या, आल्याची पूड, आल्याचे तेल आणि ओलिओरेझिन्स असे आल्यापासून अनेक पदार्थ तयार केले जाऊ शकतात. आले हे महत्त्वाचे बहुपयोगी पीक आहे. टोमॅट सॉस, केचप, सॅलड ड्रेसिंग, मांसाचे सॉस, ग्रेवी, लोणचे आणि अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये आल्याचा स्वाद वाढवण्यासाठी वापर होतो. आल्यामुळे अन्न पचन आणि अभिशोषणास मदत होते आणि जंतुनाशक गुणधर्मामुळे आल्याचा औषधांमध्येही वापर केला जातो. आले-आधारित उत्पादनांचा, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, सौम्य पेय, डबाबंद मांस, मिठाई, तंबाखू प्रक्रिया, साबण उत्पादन अशा अनेक उद्योगांमध्ये व्यापक प्रमाणावर उपयोग आहे. म्हणून आल्याच्या बाजारपेठेचा गांभीर्याने विचार करायला हवा. त्यादृष्टीने निर्यातीच्याही चांगल्या संधी आहेत.

आल्यातील जिंजेरॉल या जहाल पदार्थामुळे त्याला एक विशिष्ट तिखट आणि झणझणीत चव असते. आल्याच्या तेलामुळे माणसाला अनेक महत्त्वाचे लाभ होतात. आल्याचे बाष्पनशील तेल मुळाच्या भागाचा अर्क काढून, विद्रावक निष्कर्षणाद्वारे आणि अधिक्रांतिक कार्बनडाय ऑक्साईड निष्कर्षण पद्धतीद्वारे (सुपरक्रिटिकल कार्बनडाय ऑक्साईड एक्स्ट्रॅक्शन) काढले जाते. सुपरक्रिटिकल कार्बनडाय ऑक्साईड एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने शुद्ध तेल मिळते. इतर अनेक महत्त्वाच्या बाष्पनशील तेलांबरोबर याचे मिश्रण करून विविध आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते.

आले सामान्यपणे तीन रूपात आढळते: ताजे (हिरवे)आल्याचे मूळ, खारे पाणी किंवा पाकातील आले, वाळवलेले आले (सूंठ) किंवा सूंठ पूड. आल्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करणे ही अन्नप्रक्रिया उद्योगातील मोठा भाग आहे.

प्रकल्पासाठी लागणारी उपकरणे आणि खर्च
१) आल्याचे तुकडे करण्यासाठी यंत्र, क्षमता १ टन प्रती दिवस. रु.५,५०००/-
२) ड्रायर, क्षमता कमी तापमानावर दररोज १ टन प्रती दिवस रु. ३,२५०००/-
३) सुपरक्रिटिकल ओलिओरेझिन एक्स्ट्रॅक्टिंग युनिट, क्षमता १२५ कि. प्रति दिवस. रु. १,१००००/-
४) सॉल्व्हंट सेपरेटर युनिट, क्षमता १०० लि. प्रति दिवस. रु. ४,५०००/-

- सुनील कुलकर्णी

About the author  ⁄ kalindi

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)