रोगांपासून वाचवा म्हशीच्या पारडांना

म्हशींच्या गोठ्यामध्ये शेण, मूत्र, सडलेला चारा इत्यादींमुळे सूक्ष्म जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे अनेक संक्रमणांचा आणि रोगराईचा धोका निर्माण होतो. म्हशीची पारडे आजारी पडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. आजारामुळे त्यांचा मृत्यूदर वाढू शकतो. त्यामुळे डेअरीचे भवितव्य संकटात येते. हे प्रकार टाळण्यासाठी म्हशीच्या पारड्यांचे चोख व्यवस्थापन केले पाहिजे.

म्हशीच्या वासरांमध्ये (पारडे) पहिल्या सहा महिन्यांत आणि त्यातल्या त्यात वयाच्या पहिल्या तीन महिन्यांत मृत्यूदर जास्त असतो. याचे प्रमुख कारण असे आहे की, गोठ्यातील अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचे संक्रमण होते आणि कृमींच्या त्रासामुळे मृत्यूदर वाढतो. जेव्हा पारडे गोठ्यात इतरत्र चाटतात तेव्हा त्यांच्या पोटात कृमी, त्यांची अंडी आणि इतर सूक्ष्म जिवाणू प्रवेश करून अनेक प्रकारची संक्रमणे आणि आजार निर्माण करतात. हे टाळण्यासाठी स्वच्छता बाळगावी.

गोठ्यात आणि आसपास पडलेले शेण, मूत्र, कचरा वगैरे ताबडतोब दूर करून तेथे पाणी ओतून स्वच्छता करावी. सर्व वासरांना एकाच घमेल्यात दूध पाजू नये. दुसर्‍या घमेल्याची गरम पाण्याने व्यवस्थित स्वच्छता करून त्यात दूध पाजावे. उरलेले दूध दुसर्‍या पारड्यास पाजू नये. कारण त्यात पहिल्या पारड्याची लाळ मिसळलेली असते व त्यामुळे संक्रमण होऊ शकते. बिनाजोडाची गोल आकाराची कोरडी आणि स्वच्छ घमेली कल्हई केलेली किंवा ऍल्युमिनियमची घमेली दूध पाजण्यासाठी वापरावी. रिकामी घमेली प्रथम थंड पाण्याने स्वच्छ धुवावी मग त्यात गरम पाणी आणि धुण्याच्या सोड्याचे मिश्रण घालून ती स्वच्छ घासावी आणि परत गरम पाण्याने स्वच्छ घासावी. शेवटी ती उन्हात लोखंडी रॅकमध्ये उपडी (उलट) घालून चांगली कोरडी होईपर्यंत तापवून सुकवावी. दूध पाजण्याआधी एक तास आधीपर्यंत पाड्यांच्या तोंडाला दोरीची मुसकी बांधावी, दूध पाजल्यानंतर स्वच्छ कापडाने त्यांचे तोंड कोरडे करावे आणि त्यांना एक चिमूटभर मीठ चाटवावे म्हणजे त्यांना इतरत्र चाटण्याची इच्छा कमी होईल. नंतर परत एक तासापर्यंत त्यांच्या तोंडाला पुन्हा मुसकी बांधावी. यामुळे त्यांच्या इतरत्र चाटण्याच्या सवयीला पायबंद बसतो आणि त्यांना संक्रमणांचा आणि कृमीचा त्रास कमीत कमी होतो.

नाळ बांधणे
म्हैस व्यायल्यानंतर पारड्याची नाळ त्याच्या शरीरापासून एक ते दीड इंच अंतरावर आयोडीन किंवा तत्सम जंतुनाशक औषधात बुडविलेल्या दाट दोर्‍याने घट्ट बांधून उरलेला खालचा लोंबकळणारा भाग स्वच्छ ब्लेडने कापून घ्यावा. जखम भरेपर्यंत रोज जंतूनाशक औषध लावावे. यामुळे अनेक संक्रमणांपासून पारड्याचे रक्षण होईल.

चीक पाजणे
नुकत्याच जन्म झालेल्या पारड्यास अर्ध्या तासाच्या आत तिच्या (मातेचा) चिक पाजावा. त्यात गॅमा ग्लोबीलीन नावाची प्रतिपिंडे भरपूर असल्यामुळे वासराची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. त्यामुळे मृत्यूदर कमी होतो.

कृमीनाशक औषधी पाजणे
पारडाच्या आतड्यात अनेक प्रकारची कृमी होऊ शकतात. ते पाड्यांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे खाल्लेला चारा व दूध त्यांच्या अंगी लागत नाही. त्यांची शरीरवाढ खुंटते म्हणून त्यांना दर तीन महिन्यांतून एकदा अलबेन्डॅझॉलसारखे कृमीनाशक औषध पाजावे.

बाह्य परजीवींचा नाश
बाह्य परजीवी जसे उवा, गोचीड, गोमाशा, पिसू वगैरे पारडांना चावतात आणि त्यांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे त्या बेचैन राहतात. त्यांचे खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष राहत नाही आणि त्यांना दुय्यम आजार जसे थायलेरियॅसिस, लेप्टोस्पायरोसिस, बॅबेशिओसिस वगैरे होण्याची शक्यता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी त्यांना रोज खरारा करावा. (अंगावर ब्रश फिरवावा) त्यांना रोज पाण्याने आंघोळ घालावी. एवढे करूनही बाह्य परजीवींचा उपद्रव झाल्यास तर त्यांच्या नाशासाठी योग्य औषध जसे सायपरमेट्रीन एक मिलिलीटर किंवा डेल्टामेट्रीन दोन मिलिलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून वेगळ्या पंपाने वासरांच्या शरीरावर फवारावे.

लसीकरण
पारडांना पावसाळ्याआधी पशूंच्या डॉक्टरांकरवी तोंडखुरी, पायखुरी रोग, घटसर्प, काळपोई आणि फर्‍या वगैरे रोगांविरुद्धच्या लसी टोचून घ्याव्यात. म्हणजे त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यापासून त्यांचे रोगांपासून संरक्षण होईल.

- डॉ. सुनील रोकडे,
प्रमुख शास्त्रज्ञ (पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन) कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर

About the author  ⁄ kalindi

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)