कुक्कुटपालन व्यवसायाचे भविष्य

शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अल्पभूधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी हा व्यवसाय आधारस्तंभ बनला आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून हा व्यवसाय चढत्या क्रमाने विकसित झालेला आहे व होत आहे. कुक्कुटपालन व्यवसाय किफायतशीर कसा होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असून स्पर्धेच्या जगात या व्यवसायात टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल.

tableकोंबडीपालन व्यवसाय हा भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनला आहे. शास्त्रशुद्ध कोंबडीपालनास एक सुसंघटित उद्योगाचे रूप प्राप्त झाले आहे. व्यवसायाच्या विभिन्न शाखा जसे अंडी उबवणी करून पिले काढणे, पालनपोषण करणे, संतुलित आहार, उपकरण तथा रोगनियंत्रण याबाबत पुष्कळ विकास झाला आहे. आज या क्षेत्रात बरीच आत्मनिर्भरता आली आहे.

ग्रामीण महिलांसाठी हा व्यवसाय एक अतिरिक्त मिळकतीचा स्रोत ठरू शकतो. हा व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्यास मदत करू शकतो. ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत आणि दारिद्य्ररेषेखालील घटकांसाठी तथा शेतकर्‍यांसाठी अतिरिक्त उत्पन्न व पौष्टिक आहारासाठी सर्वोत्तम व कमी भांडवल लागणारा व्यवसाय म्हणजे कोंबडीपालन होय. या व्यवसायापासूनच कुक्कुटपालकांना अनेक लाभ होऊ शकतात.

* इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी गुंतवणूक करून कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो व कुटुंबासाठी अतिरिक्त मिळकतीचा स्रोत होऊ शकतो.
* विभागलेली शेतजमीन असल्याने कोंबडीपालन फायदेशीर करता येते. तसेच शेतजमिनीसाठी खताची उपलब्धता कोंबड्यांच्या विष्ठेपासून पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे रासायनिक खतावरील खर्च वाचविता येईल.
* कोंबड्यांपासून मिळणार्‍या खतात अन्य पशूंच्या तुलनेत नायट्रोजन तथा फॉस्फरस रासायनिक तत्त्वांची मात्रा अधिक असल्याने जमिनीची उर्वरकता वाढविण्यास मदत होते.
* पडिक जमिनीवर हा व्यवसाय करता येतो.
* अन्य पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत कमी जमीन लागते.
* कोंबडीपालन व्यवसाय स्वीकारल्यास ग्रामीण भागातील अथवा सुशिक्षित बेरोजगारांची समस्या कमी केली जाऊ शकते.
* हा व्यवसाय संतुलित आहार प्राप्त करण्यास सहाय्यक सिद्ध होऊ शकतो.
* या व्यवसायाद्वारे कमी वेळात प्राप्ती सुरू होते. उदा. ब्रॉयलर उत्पादन दीड ते दोन महिन्यांत तथा अंडी घालणार्‍या कोंबड्यांपासून ५ ते ६ महिन्यांत प्राप्ती सुरू होते.
कोंबडीपालनाचा व्यवसाय हमखास फायदेशीर व्हावा म्हणून काही तत्त्वांचा विचार करणे आवश्यक ठरते. या तत्त्वांची विभागणी ५ भागांत केली आहे. पाचपैकी कोणत्याही एका गोष्टीची कमतरता असल्यास यश मिळणार नाही.
१) कोंबड्यांची जात, २) खाद्य,
३) आरोग्यरक्षण, ४) व्यवस्थापन, ५) सुयोग्य विपणन व्यवस्था

table-1कोंबड्यांची जात
आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी पक्ष्यांची जननक्षमता तपासून पाहणे आवश्यक असते. पक्ष्यांची निवड करताना अंडी उत्पादनासाठी असल्यास पक्षी भरण्याची संख्या, पहिले अंडे मिळाले तो दिवस, ५० टक्के उत्पादनाच्या वेळचे वय, जास्तीत जास्त उत्पादन मिळाले, त्या आठवड्याची सरासरी, ५२ आठवड्यांत हेन हाऊस्ड उत्पादन ५२ आठवड्यांत मर व कल्स. तुमच्या फार्मवर तुम्ही एक कोंबडी जास्त जगविल्यास वर्षाकाठी निदान २५०-२६० अंडी जास्त मिळतील. ज्यामुळे तुमच्या नफ्यात भरच पडेल. मांसल कोंबडी उत्पादनात पक्ष्यांची शारीरिक क्षमता व खाद्य परिवर्तनाचे गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे आहे.

खाद्य
कुक्कुटपालन व्यवसायात खाद्याचा खर्च एकूण व्यवसायाच्या खर्चाच्या ८० टक्के आहे आणि भारतातील खाद्यखर्च हा पाश्‍चिमात्य देशांच्या तुलनेत दहापट जास्त आहे. अशा परिस्थितीत आपणाला असा पक्षी पाहिजे की, जो कमीत कमी खाद्य खाऊन त्याचे जास्तीत जास्त अंडी किंवा मांसात रूपांतर करील. पक्ष्यांचे खाद्य विकत घेताना समतोल आहे किंवा नाही, याकडे लक्ष पुरवा व नेहमी उज्ज्वल परंपरा असणार्‍या फार्मकडून विकत घ्या. स्वस्त दराच्या खाद्याने व्यावसायिकांनी हुरळून जाऊ नये. दर १० अंड्यांना तुम्ही खाद्याची ५ टक्के बचत करू शकल्यास तुमच्या नफ्यात खूपच भर पडेल.

आरोग्यरक्षण
कोंबड्यांच्या कळपात मृत्यूचे प्रमाण वाढल्यास व्यवसायात तोटा येऊ शकतो. यासाठी फार्मवर रोग होऊ न देणे, रोगराई टाळण्यासाठी काही प्रतिबंधक गोष्टींकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. रोगाचा प्रादूर्भाव कमी केल्यास औषधावर होणारा अनावश्यक खर्चदेखील टाळता येईल.

व्यवस्थापन
कोणताही व्यवसाय फायदेशीर करायचा असल्यास व्यवस्थापनाचा भाग अतिशय महत्त्वाचा असतो; परंतु दुर्दैवाने याकडे कुक्कुटपालकांचे आवश्यक तेवढे लक्ष नसते. बहुतांश व्यावसायिकांना असे वाटते की, उत्तम जातीच्या कोंबड्या व खाद्य घेतल्यास अपेक्षित उत्पादन गाठता येईल; परंतु व्यवस्थापनात लक्ष नसल्यास व्यवसाय तोट्यात आल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम कोंबड्यांच्या घरबांधणीकडे लक्ष पुरवा म्हणजे कोंबड्यांच्या घरात हवा खेळती राहील. कोंबड्यांच्या घरातील वायूचलन व्यवस्थित नसल्यास अमोनियाचे प्रमाण वाढेल व उत्पादनात घट येईल. पर्याप्त उत्पादनासाठी उत्तम वायूचलन आवश्यक आहे. कोंबड्यांना स्वच्छ हवेचा पुरवठा होतो आहे की नाही, हे तपासून बघा. पाण्याच्या नाल्या स्वच्छ होतात का, याकडे लक्ष द्या. अस्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या नालीत खाद्याचे कण साचून राहतात. यामुळे कुजण्याची क्रिया होते व असे पाणी पक्ष्यांना हानिकारक ठरते. पाणीपुरवठा आवश्यक अंतराने झाला पाहिजे. चुकून पाणी दिले गेले नसल्यास पक्ष्यांचे निर्जलीकरण होऊन उत्पादनात घट येईल. पक्ष्यांना लागणारे खाद्य चार वेळेस विभागून द्या, अन्यथा पक्ष्यांना समतोल आहार मिळणार नाही. खाद्याची भांडी जेव्हा पूर्ण भरलेली असतात तेव्हा पक्षी फक्त दाणे वेचून खातात व त्यांची ऊर्जेची आवश्यकता पूर्ण झाल्यावर खाद्य खात नाहीत. यामुळे सेवनात पोषक तत्त्वांचा असमतोल निर्माण होतो.

सुयोग्य विपणनव्यवस्था
पोल्ट्री फार्मचे अंतिम तथ्य म्हणजे उपयुक्त ग्राहक व बाजाराची उपलब्धता. व्यवसायातील लाभ किंवा हानी अंडी अथवा ब्रॉयलर्सच्या विक्रीतून मिळणार्‍या मिळकतींवर अवलंबून असतो. कुक्कुटपालकांनी दलालांच्या अथवा मध्यस्थांमार्फत आपल्या मालाची विक्री न करता सरळ ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंडे हा एक नाशवंत पदार्थ असल्याने त्याचे स्टोरेज पॅकिंग व्यवस्थित असावे. उन्हाळ्याच्या विक्रीची योग्य व्यवस्था असावी. पक्ष्यांचा पुरवठा सरळ आणि वेळेवर, मांस विक्रीचे दुकान/हॉटेल इत्यादी ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावा. स्वच्छता, प्रकाशयोजना, पक्ष्यांची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक कुक्कुटपालकास व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी मूळ वैज्ञानिक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

रँडम सॅम्पल एग लेइंग अथवा ब्रॉयलर टेस्ट
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत येणार्‍या केंद्रीय/क्षेत्रीय कुक्कुटपालन फार्मस्द्वारा विविध हॅचरीमध्ये उत्पादित लेयर स्टॉकच्या अंडी उत्पादनक्षमतेची चाचणी तसेच ब्रॉयलर पक्ष्यांची मांससंबंधी वाढ, शारीरिक वजन इत्यादींसाठी करण्यात येणारी ही टेस्ट आहे. या चाचणीद्वारे कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण किंवा खाद्याचे अंड्यात व मांसात रूपांतर करण्याची क्षमता इत्यादीबाबतची माहिती एकत्रित केली जाते. ही माहिती कुक्कुटपालकांना अंडी घालणार्‍या अथवा ब्रॉयलर पक्ष्यांच्या पिलांची योग्य निवड करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
* अंडे हे सर्व वयोगटांतील जनतेचे एक पोषक खाद्य आहे.
* अंड्यातील प्रथिने उच्चतम गुणवत्तेची असून एकंदर ३३ अमिनो ऍसिडस्पैकी २३ अंड्यात उपलब्ध आहेत.
* सर्वात स्वस्त पशुजन्य प्रथिनांचा स्रोत
* ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव

भारतात दरडोई वार्षिक उपलब्धता ३३ अंडी आणि ५२५ ग्रॅम चिकन अशीच आहे. दरडोई अंड्याची वार्षिक उपलब्धता १८० अंडी व ६ कोंबड्या अथवा ९ किलो मांस असें शासनाने ठरविलेले उद्दिष्ट आहे. अंड्यांच्या उत्पादनात दरवर्षी १० टक्के तर ब्रॉयलर चिकनच्या उत्पादनात २० टक्के वाढ होत आहे. भविष्यातील उत्पादनवाढीचा वेग साधायचा असल्यास १३५ दशलक्ष उत्तम प्रतीच्या अंडी घालणार्‍या कोंबड्या व ४५० दशलक्ष ब्रॉयलर पिलांची आवश्यकता राहील. यासोबतच कोंबड्यांच्या खाद्याची वार्षिक मागणी ७.५ दशलक्ष टनांपर्यंत जाईल.

- प्रा. डॉ. ना. पु. दक्षिणकर
औषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर

About the author  ⁄ kalindi

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)