पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ङ्गळबाग लागवड केलेल्या शेतकर्यांना बसत आहे. पाण्याअभावी अनेकांना आपल्या फळबागा मोडाव्या लागल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीतही मराठवाड्यातील काही शेतकरी जिवाचे रान करून नवनवीन तंत्रज्ञान वापरून ङ्गळबागा जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेेत. याबाबतीत औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ आणि देवगाव येथील शेतकरी गटाचे व आडगाव (ठोंबरे) येथील प्रयोगशील शेतकर्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. ङ्गळबागा जगविण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी हे शेतकरी ‘मल्चिंग’ व ‘पोरस पाईप’सारख्या तंत्राचा वापर करत आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणून शेतातील पिके व फळबागा जगविण्याचा त्यांचा प्रयोग इतर शेतकर्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
औरंगाबाद-बीड मार्गावर असलेल्या आडूळ भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर ङ्गळपिकांची लागवड केलेली आहे. यात डाळिंब, मोसंबी उत्पादक शेतकर्यांची संख्या मोठी आहे. यंदा हा परिसरही दुष्काळाच्या झळांनी त्रस्त आहे. या भागात यावर्षी जेमतेम एक-दोन पाऊस झाले. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची सोयदेखील होऊ शकली नाही, तर मग शेतीसाठी पाणी मिळणे तर दुरापास्तच! पाण्याचा असा दुष्काळ पाहता, लहान मुलाप्रमाणे सांभाळलेल्या आणि लाखो रुपये खर्चून ङ्गळाङ्गुलाला आलेल्या ङ्गळबागा केवळ पाण्याअभावी जळताना बघून कोणत्याही शेतकर्याचे काळीज करपणारच!…
आडूळ परिसरातील शेतकर्यांचीही तीच अवस्था झाली. शेतकर्यांना आसमानी संकटे तशी नवी नाहीत. पाण्याअभावी जळणार्या बागा बघून गप्प बसेल तो शेतकरी कसला? आडूळ व परिसरातील शेतकर्यांनी मेहनत व जिद्दीला ‘मल्चिंग तंत्रा’ची जोड देत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व पाण्याची बचत करून फळबागा जगविण्याचा प्रयोग केला आहे.
आडूळ येथील शेतकरी अनिल पिवळ यांनाही आपल्या आसपासच्या भागातील शेतकर्यांच्या ङ्गळबागा पाण्याअभावी सुकताना बघून मनावर मोठे दडपण आले. आपली तीन एकर मोसंबीची बाग केवळ पाण्याअभावी जळेल की काय, याची केवळ कल्पनादेखील त्यांना सहन होईना. त्यांच्याकडे एक शेततळे आहे. यात टँकरने विकतचे पाणी आणून टाकण्याचे त्यांनी ठरविले खरे; पण यासाठी मोजावी लागणारी मोठी रक्कम आणि पाणी कुठपर्यंत टिकेल याची शाश्वती नव्हती. अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आले ‘मल्चिंग तंत्र’. शेतकरी गटाच्या माध्यमातून ‘मल्चिंग तंत्रा’चा उपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनिल पिवळ हे ‘जय किसान शेतकरी गटा’शी जोडले गेले आहेत. त्या गटातील दीपक जोशी, बप्पासाहेब वाघ आणि इतर तरुण शेतकर्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व शेतीला सहाय्यक ठरणार्या तंत्राचा वापर करून ङ्गळबागा जगविण्यासाठी काय करता येईल, याचा शोध सुरू केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फळबागा जगविण्यासाठी या शेतकर्यांकडे पाणीच उपलब्ध नव्हते. तेव्हा शेजारच्या भागात उपलब्ध असलेले पाणी टँकरने विकत आणण्याचे या शेतकर्यांनी ठरविले. विकत घेतलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरावा आणि पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन थांबावे, यासाठी काही उपाययोजना आखल्या.
बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर उपयोग होण्यासाठी हे शेतकरी सुरुवातीपासून ङ्गळबागांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. ठिबक सिंचनाने पाणी देऊनही उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्षीभवन होत असल्याचे या शेतकर्यांच्या लक्षात आले. यामुळे ङ्गळबागांना दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी ‘मल्चिंग तंत्रा’चा वापर करण्याचे त्यांनी ठरविले. ‘मल्चिंग’ करताना शेतातील पाला-पाचोळा किंवा भुसा यांचा वापर करून विनाखर्चिक
‘मल्चिंग’चा पर्याय राबविण्याचा विचार या शेतकर्यांनी सुरुवातीला केला. मात्र, हा पर्याय अवलंबिल्यास जनावरांचा चाराच यासाठी वापरावा लागणार, असे त्यांच्या लक्षात आले. यामुळे जनावरांसाठी सध्या उपलब्ध असलेला चारा संपुष्टात आला असता. त्यामुळे ‘प्लॅस्टिक मल्चिंग’ करण्याचा पर्याय शेतकर्यांनी निवडला. सोबतच जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असणार्या पॉलीमर पावडरचा वापर करण्याचे या शेतकर्यांनी ठरविले. याचा वापर योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी कृषी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यशाळा या शेतकर्यांनी घेतली. या कार्यशाळेत पाण्याच्या प्रत्येक थेेंबाचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर व्हावा, यासाठी गटातीलच शेतकर्यांनी सुपीक कल्पना मांडल्या.
कमी खर्चातील ‘मल्चिंग तंत्र’
‘प्लॅस्टिक मल्चिंग’चा वापर करताना ८० ते १०० मायक्रॉन जाडीचा ‘मल्चिंग पेपर’ वापरावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. सद्य:स्थितीत एवठ्या जाडीचा पेपर वापरणे या शेतकर्यांना परवडणारे नव्हते. कारण, या जाडीच्या चारशे मीटर पेपरसाठी साडेपाच ते सहा हजार रुपये खर्च येणार होता. यामुळे या शेतकर्यांनी कमी खर्चातील ३० मायक्रॉन जाडीचा ‘मल्चिंग पेपर’ वापरण्याचे ठरविले. यातही कमी किमतीतील पेपर कुठे मिळेल याचा शोध सुरू केला. विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये शोध घेतल्यानंतर नाशिक येथील ‘भूमिका प्लॅस्टिक’ च्या डिलरकडून दोन हजार रुपये दराने त्यांनी ‘मल्चिंग पेपर’चे १५० गठ्ठेे खरेदी केले. खरेदी केलेले ‘मल्चिंग पेपर’चे तुकडे करून बुंध्याभोवती ‘मल्चिंग’ केल्याने खर्चात बचत झाली. काही शेतकर्यांनी झाडांच्या दोन ओळीतही ‘मल्चिंग’ केले. आडूळ आणि देवगाव येथील शेतकरी गटातील ३५ शेतकर्यांनी मिळून जवळपास शंभर एकरावरील १६ हजार ९०० ङ्गळझाडांना ‘मल्चिंग’ केले. झाडाच्या बुंध्याभोवती ‘मल्चिंग’ करण्यासाठी एका झाडाला २० रुपयांचा पेपर आणि दहा रुपये मजुरी लागली. ‘मल्चिंग’ करण्याअगोदर झाडाच्या बुंध्याजवळ शेणखत टाकून २० गॅ्रम पॉलीमर पावडर टाकली.
पॉलीमर पावडरची एकत्रित खरेदी
पॉलीमर पावडर एकत्रितपणे खरेदी केल्याने कमी किमतीत मिळाली. जालना येथील प्रगत शेतकरी केंद्रातून ‘विल इंडिया’ या कंपनीची एक क्विंटल पॉलीमर पावडर या शेतकर्यांनी खरेदी केली. किरकोळ बाजारात या पॉलीमर पावडरची किंमत ८५० रुपये प्रतिकिलो एवढी असताना, ती एकत्रितरीत्या खरेदी केल्यामुळे ७०० रुपये किलो या दरात मिळाली.
फळबाग जगविण्यासाठी विकतचे पाणी
आडूळ येथील ‘जय किसान शेतकरी मंडळा’चे अध्यक्ष बप्पासाहेब वाघ या तरुण शेतकर्याकडे मोसंबीचे अडीच आणि शेवग्याचे एक एकर क्षेत्र आहे. पाण्याअभावी या बागा जळून जातील याची चिंता करत बसण्यापेक्षा वाघ यांनी फळबाग वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बागा जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याचे त्यांनी ठरविले. विकत घेतलेले पाणी सुरक्षित साठविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. यासाठी त्यांनी महिन्यापूर्वी १ लाख १० हजार रुपये खर्चून शेततळे खोदले. जवळपास ३० हजार रुपये खर्चून १० लाख लिटर पाणी टँकरने आणून या शेततळ्यात सध्या त्यांनी साठविले आहे. शेततळ्यातील पाण्याच्या होणार्या बाष्पीभवनाचा विचार करून आणखी पाच लाख लिटर पाणी विकत घेण्याची त्यांची तयारी आहे. शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या थेेेंब न् थंेंबाचा वापर पिकांना व्हावा, यासाठी झाडांच्या दोन्ही रांगांमध्ये ठिबक सिंचनाने पाणी देण्याची व्यवस्था केली आणि त्याला ‘मल्चिंग’ केले. ‘मल्चिंग’ केल्याने पाण्याचे होणारे बाष्पीभवन जवळपास ७० टक्के कमी झाले. यामुळे एकदा पाणी दिल्यावर किमान पाच-सहा दिवस तरी पाणी देण्याची गरज पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘रुट झोन’ला दिले पाणी
आडूळचेच शेतकरी पांडुरंग काळे यांनी बटाईने मोसंबीची ङ्गळबाग लागवड केली आहे. बटाईच्या शेतात असणार्या विहिरीला जेमतेम पाणी राहत असल्याने त्यांनी पाच-सहा वर्षांपूर्वीच विहीर पुनर्भरणाचा प्रयोग केला. विहिरीजवळूनच वाहणार्या एका ओढ्यातून विहिरीत पाणी आणण्याचे काम त्यांनी केले आहे. यामुळे सद्य:स्थितीत त्यांच्या भागात इतर विहीर कोरड्याठाक पडल्या असतानाही त्यांच्या विहिरीला ङ्गळबाग जगविण्याइतपत पाणी उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पांडुरंग काळे यांनीही ‘मल्चिंग’ चा वापर केला खरा; मात्र खर्चात काटकसर करण्यासाठी त्यांनी
‘मल्चिंग पेपर’ वापरताना ‘रुट झोन’चा विचार केला. मोसंबीच्या बुंध्याच्या दोन्ही बाजूंना दहा बाय चार फूट रुंदीचे ‘मल्चिंग’चे तुकडे वापरले. झाडांच्या चारही कोपर्यात ठिबक सिंचनाच्या नळ्या सोडल्या. विशेष म्हणजे ठिबक सिंचनाच्या नळ्या उन्हाने तापून पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी नळ्यांना मातीने झाकून टाकले आहे. पाणी जमिनीत जास्त काळ टिकून रहावे, यासाठी पॉलीमर पावडरचा वापर त्यांनी सुरू केला आहे.
उत्पादन घेण्याचा निश्चय
आजघडीला आडूळ परिसरात पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पाणीटंचाई लक्षात घेता ङ्गळबागांतून उत्पादन घेता येईल, अशी सध्याची परिस्थिती नाही. आगामी पावसाळ्यापर्यंत फळबाग जगविण्याइतके जरी पाणी मिळाले, तरी या शेतकर्यांना दिलासा मिळू शकेल. सध्या जेमतेमच पाणी उपलब्ध असल्याने ङ्गळ बागायतदार शेतकरी उत्पादनाच्या नादी न लागता फळझाडे जगविण्यासाठी पाणी देत आहेत. कमी पाणी लागावे म्हणून शेतकरी झाडांना आलेली ङ्गळे काढून टाकत असल्याचे चित्र एका बाजूला असताना दुसरीकडे प्रल्हाद पिवळ यांनी मात्र मोसंबीचे मृग बहाराचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. सध्या त्यांच्या शेतातील मोसंबीची झाडे ङ्गळांनी लगडलेली आहेत. या झाडांना लागेल तेवढे पाणी विकत घेण्याची त्यांची तयारी असून, त्यांनी झाडांना ‘मल्चिंग’ केले आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीतही किमान दीड-दोन लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे.
फळबागांसाठी ‘मल्चिंग’ महत्त्वपूर्ण
सद्य:स्थितीत पाण्याची टंचाई लक्षात घेता ङ्गळबागा जगविण्यासाठी तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय शेतकर्यांनी करणे गरजेचे आहे. सा. ‘आधुनिक किसान’ च्या अंक क्र. ४३ मध्ये याबाबत स्वतंत्र लेख प्रकाशित केलेला आहे. ङ्गळबागांसाठी ‘मल्चिंग’चा वापर महत्त्वपूर्ण आहे आणि शेतकरी या तंत्राचा वापर करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
- डॉ. संजय पाटील सोयगावकर कृषिशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना
मो. नं. ९८२२०७१८५४
‘मल्चिंग’ साठी अनुदानाचेनिकष बदलावेत
शासनाकडून ‘मल्चिंग’साठी अनुदान दिले जाते. मात्र, अनुदान केवळ शंभर मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरसाठी देण्यात येते. ही रक्कम सर्वसामान्य शेतकर्यांना परवडणारी नाही. यामुळे शासनाने ३० मायक्रॉनच्या ‘मल्चिंग पेपर’साठीदेखील अनुदान द्यावे. यामुळे हा पेपर आगामी सात-आठ महिने जरी टिकला तरी बर्याच शेतकर्यांच्या ङ्गळबागा वाचतील.
- दीपक जोशी
अध्यक्ष, जय जवान जय किसान शेतकरी मंडळ, देवगाव, ता. पैठण,
जि. औरंगाबाद, मो. नं. ७५८८९३१९१३
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा
सध्याची परिस्थिती लक्षात घेता केवळ पाण्याअभावी शेतकरी अडचणीत आला आहे. यापुढील काळातही पाणी मुबलक उपलब्ध असले तरीदेखील पिकाला देताना काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आम्हाला समजली आहे आणि ती इतर शेतकर्यांनीही समजून घ्यावी.
- बप्पासाहेब वाघ
अध्यक्ष, जय किसान शेतकरी मंडळ, आडूळ, ता. पैठण, जि. औरंगाबाद
मो. नं.९७६३५६८७७७
डाळिंबाला ‘पोरस पाईप’ने पाणी
सा. ‘आधुनिक किसान’ ने ‘पोरस पाईप’ विषयी घेतलेल्या कार्यशाळेत ‘पोरस पाईप’च्या प्रयोगाने प्रेरित होऊन आडगाव (ठोंबरे) येथील शेतकरी राजू कुबेर यांनी डाळिंब ङ्गळबागेसाठी कमी पाणी लागणार्या ‘पोरस पाईप’ चा प्रयोग केला आहे. कुबेर यांच्याकडे ८० लाख लिटर क्षमतेचे शेततळे आहे. यंदा जेमतेम पाऊस झाल्याने शेततळे भरताच आले नाही आणि या शेततळ्याच्या अस्तराला छिद्रे पडल्यामुळे थोडेङ्गार शिल्लक असलेले पाणी जिरून गेले. या संकटापुढे हार न मानता कुबेर यांनी पावणेदोन एकर डाळिंबाची बाग वाचविण्याचा निर्धार केला. विहिरीतून जेमतेम पाणी मिळत असल्याने विविध ठिकाणी चार बोअर घेतल्या. यापैकी दोन बोअरला सध्या पाणी आहे; मात्र तेदेखील २० ते २५ मिनिटे चालतात. यामुळे झाडांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे म्हणून कुबेर यांनी ङ्गळबागेत ‘पोरस पाईप’ ची यंत्रणा बसविली आहे. यासाठी त्यांनी ‘ऍप्रोटेक’ कंपनीच्या (१६ एमएम) ‘पोरस पाईप’ची निवड केली आहे. प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी सव्वातीन मीटर ‘पोरस पाईप’ वर्तुळाकार पद्धतीने टाकून पाईप पूर्णपणे मातीते बुजून टाकला आहे. पावणेदोन एकरासाठी मजुरीसह त्यांना जवळपास ६० हजार रुपये खर्च आला आहे. यामुळे पाण्याअभावी डाळिंब जगतील का नाही, या विवंचनेत असणारे राजू कुबेर आता आगामी ङ्गळबहार घेण्याच्या तयारीत आहेत. ङ्गळबागेला पाणी देताना मिठाचादेखील वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. राजू कुबेर यांच्या प्रेरणेतून नारायण कुबेर यांनी तीन एकर डाळिंबात ‘पोरस पाईप’ची उभारणी करण्याचे ठरविले आहे.
- राहुल कुलकर्णी

मल्चिंग वरची माहिती खूप उपयोगी आहे. महिनाभरापूर्वीच आधुनिक किसान ने त्याबाबत पुढाकार घेतला आणि ही माहिती प्रसिद्ध केली. त्याबद्दल खूप आभारी आहोत. आज हीच माहिती अग्रो वन दैनिकात वाचली. आधुनिक किसान किती पुढे आहे याची त्यामुळे प्रचीती आली. धन्यवाद