शेतकर्यांना नगदी पैसा मिळवून देणारे बागायती पीक म्हणून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. कलिंगडाच्या सुधारित व संकरित जातीमुळे एका वेलीवर अनेक फळ येतात. यंदाही पाण्याची समस्या भेडसावत असल्याने कमी पाण्यात टरबूज पीक घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे.
जमीन आणि हवामान
कलिंगड (टरबूज) हे नदीपात्रात तसेच शेतजमिनीत लावता येते. या पिकासाठी उत्तम निचर्याची, मध्यम, काळी, पोयट्याची किंवा गाळाची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.० असावा. चोपण व पाणी धरून ठेवणारी किंवा अत्यंत हलक्या जमिनीत हे पीक घेऊ नये. भारी जमिनीत उत्पादन जास्त मिळते. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण व कोरडे हवामान मानवते म्हणून पिकाची लागवड उन्हाळ्यात करतात. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.
लागवडीचा हंगाम
थंडी कमी झाल्यानंतर जानेवारी, ङ्गेब्रुवारी महिन्यात या पिकाची लागवड करतात. बियाच्या चांगल्या उगवणीस किमान २१ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. फळे वाढीच्या काळात ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान अधिक गोडी निर्माण करते. या पिकाचा कालावधी ९० ते ११० दिवसांचा असून, फळे एप्रिल व मे महिन्यात काढणीस तयार होतात.
सुधारित व संकरित वाण
शुगर बेबी : या जातीच्या कलिंगडाची लवकर तयार होणारी फळे आकाराने लहान ते मध्यम, गोलाकार असतात. फळांचे सरासरी वजन तीन ते पाच किलोपर्यंत असते. फळाला बाहेरून काळपट हिरवा रंग व त्यावर हलके पट्टे असतात. फळातील गराचा रंग लाल व गरात साखरेचे प्रमाण १० ते १२ टक्के असते. बी छोटे राखी रंगाचे असते. हेक्टरी उत्पादन ४० ते ५० टन असते.
अर्का माणिक : अर्का माणिक ही जात करपा, केवडा व भुरी रोगास कमी बळी पडते. फळे आकाराने गोलाकार, लांब असतात. फळावरील सालीचा रंग हिरवा असून, सालीवर फिकट पांढरे पट्टे असतात. गर गुलाबी, सुगंधी व साखरेचे प्रमाण १२ ते १५ टक्के असते. फळातील बी एकाच ओळीत असते. फळाचे वजन ६ ते ८ किलोपर्यंत असते. साठवणुकीस चांगली, ११० ते ११५ दिवसांत पीक काढणीस तयार होते. सरासरी उत्पादन ४० ते ४२ टनांपर्यंत मिळते.
असाही यामाटो : हा कलिंगडाचा सुधारित वाण असून, फळाचा रंग फिकट हिरवा असतो. फळे मध्यम ते मोठ्या आकाराची व सरासरी वजन सहा ते आठ किलोपर्यंत असते. गराचा रंग लाल असून, गरातील साखरेचे प्रमाण ११ ते १३ टक्के, फळे लावणीपासून ९५ ते १०० दिवसांत काढणीस तयार होतात. हेक्टरी ३५ ते ४५ टन सरासरी उत्पादन मिळते.
अर्का ज्योती : अर्का ज्योती ही कलिंगडाची संकरित जात आहे. फळाचा आकार गोल व वजन ५ ते ६ किलोपर्यंत असते. सालीचा रंग फिकट हिरवा व सालीवर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात. साठवणुकीस चांगली जात, गुलाबी गर, सुगंधी व गोड, साखरेचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत, बियांचे प्रमाण कमी, बी लहान आकाराचे असते. प्रतिहेक्टर सरासरी उत्पादन ४८ ते ५० टनांपर्यंत मिळते. याशिवाय ऑगस्टा, पाटानेग्रा यासारखे खाजगी कंपनीचे वाणही भरपूर उत्पादन घेतात.
लागवड पद्धत
कलिंगडाची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने केली जाते. दोन सर्यांमध्ये २ मीटर तर दोन वेलीत ०.५ मीटर अंतर ठेवतात. गादीवाफा पद्धतीनेही कलिंगड लागवड करता येते. त्यामध्ये ठिबक सिंचन व प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविता येते.
बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
एक हेक्टर क्षेत्रासाठी २.५ ते ३ किलो कलिंगड बियाणे पुरेसे होते. बियाणे पेरणीपूर्वी २.५ ग्रॅम कॅप्टन किंवा कार्बेन्डॅझिम प्रतिकिलो बियाण्यांस चोळून घ्यावे.
खते व पाणी व्यवस्थापन
कलिंगड पिकास लागवडीपूर्वी प्रतिहेक्टर २५ टन चांगले कुजलेले शेणखत तसेच ५० किलो नत्र, ५० किलो स्फूरद व ५० किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी व भर लावून घ्यावी. पिकाला सुरुवातीस उगवण होईपर्यंत दोन पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान पिकाच्या वाढीच्या अवस्था यांचा विचार करून पाण्याच्या पाळ्यांचे अंतर ठेवावे. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. भारी जमिनीत ७ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फळधारणेनंतर पाणी अनियमित झाल्यास फळे तडकतात. या पिकाची लागवड ठिबक सिंचनावरही करता येते.
वेलींना वळण देणे
बियांची उगवण झाल्यावर कीडग्रस्त रोगट रोपे उपटून टाकावीत. नांगे असणार्या जागेवर बी टोकून नांगे भरून घ्यावे व पाणी द्यावे. कलिंगडाचे वाढणारे वेल उचलून दोन पाटाच्या मधल्या जागेत पसरावे. वाढणार्या फळांना पाणी लागणार नाही याची काळजी द्यावी. शेतातील वाळलेले गवत फळाखाली ठेवावे म्हणजे फळे जमिनीला टेकून खराब होणार नाहीत. पाटसर्या तणरहीत ठेवाव्यात. यासाठी दोन-तीन खुरपण्या कराव्यात. वेल वळवण्याचे काम पीक सात ते नऊ पानांवर असताना करावे. वेल ३५ ते ४० दिवसांचे झाल्यानंतर वेलीची जास्त हलवाहलव करू नये. फळे लागल्यानंतर रोगट फळे काढून टाकावीत.
संजीवकाचा वापर
कलिंगड पीक दोन व चार पानांवर असताना ‘मटिबाफ’ या संजीवकाची २५-५० पीपीएमची दोन फवारणी केल्याने मादी फुलाचे प्रमाण वाढून फळधारणा चांगली होते व उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत वाढते.
काढणी व उत्पादन
कलिंगडाची फळे लागवडीनंतर ९० ते १२० दिवसांत काढणीस तयार होतात. फळाचा जमिनीवर टेकलेला भाग पिवळसर पांढरा होतो. फळावर टिचकी मारल्यास भदभद असा आवाज येतो. फळाच्या देठाजवळील लव नाहीशी होते. फळधारणा झाल्यापासून ३० ते ३५ दिवसांत फळे काढणीस तयार होतात.
- प्रा. मंजाबापू गावडे
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
‘मल्चिंग’वर कलिंगड लागवड
उन्हाळ्यात पिकांना पाणी जास्त प्रमाणात लागत असल्याने शेतकरी पूर्वी कलिंगड (टरबूज) लागवडीसाठी आच्छादन म्हणून झाडांचा पालापाचोळा व कम्पोस्ट खताचा वापर करत असत. यंदाही पाण्याची समस्या भेडसावत असल्याने कमी पाण्यात टरबूज पीक घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. प्लॅस्टिकचे आच्छादन (मल्चिंग) उपलब्ध झाल्यामुळे जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी त्याचा वापर वाढला आहे. जमिनीच्या ३० ते ६० टक्के भागावर ३० ते १२० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक आच्छादन वापरून कलिंगड लागवड करता येते.
कलिंगड लागवड करताना जमिनीची आडवी-उभी नांगरणी करूण रोटाव्हेटरच्या साहाय्याने मशागत करावी. मशागत केल्यानंतर सात फूट अंतराची सरी तयार करावी. एका हेक्टरमधील सरीमध्ये सहा ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत, त्यानंतर प्रारंभिक रासायनिक खतांची मात्रा सरीत दिल्यानंतर सरीवर ठिबक नळी अंथरून दोन फूट अंतरावर प्लॅस्टिक ‘मल्चिंग’ला भोके पाडावीत. त्यानंतर प्रत्येक भोकात कलिंगडाचे एक-एक आधीच तयार केलेली रोपे लावावीत. या पद्धतीने शेतकरी उन्हाळ्यापाठोपाठ हिवाळ्यातसुद्धा कलिंगडाची लागवड करू लागले आहेत. त्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यात मोठे, गोल आकाराचे, फिक्कट हिरव्या रंगाचे कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात; मात्र पावसाळ्यातील लागवडीसाठी ‘आईस कॅप’ ही जात वापरली जाते. या जातीचे कलिंगड आकाराने लहान व हिरव्या रंगाचे असते. पावसाळ्यात कलिंगड लागवडीत माती व पाण्याच्या सातत्याने संपर्कामुळे पाने कुजणे, मुळकूज यांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, प्लॅस्टिक पेपरच्या साह्याने आच्छादित वेलांचा मातीशी फारसा संपर्क येत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडणे व कुजण्याचे प्रमाण कमी होते. खराब झालेली पाने सहज बाजूला करता येतात.
कलिंगड लागवडीत खालील वेगवेगळ्या प्रकारचे आच्छादन वापरले जाते.
काळ्या प्लॅस्टिकचे आच्छादन
या आच्छादनामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. साहजिकच त्यामुळे जमिनीचे तापमान वाढण्यासाठी या आच्छादनाचा तितकासा उपयोग होत नाही. मात्र, तणाचा उपद्रव कमी होतो.
सूर्यकिरणे परावर्तित करणारे आच्छादन
अशा प्रकारच्या आच्छादनामुळे मावा व तुडतुडे यांचा प्रादूर्भाव कमी होण्यास मदत होते. चंदेरी रंगामुळे सूर्यकिरणे परावर्तित होऊन पिकाला सर्व बाजूंनी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळून जोमदार वाढ होते.
‘इन्फ्रारेड’ प्रकाशात पारदर्शी आच्छादन
यातून सूर्यप्रकाशातील ‘इन्फ्रारेड’ किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, तणांच्या वाढीस उपयुक्त किरणे पोहोचत नसल्यास तणांची वाढ रोखली जाते. पीक ७ ते १० दिवस अगोदर तयार होते. या आच्छादनाचा रंग हिरवट विटकरी असतो.
आच्छादनाचे फायदे
* जमिनीच्या तापमानात वाढ होते. सूर्यप्रकाशाचा कालावधी, जमिनीचा प्रकार व जमिनीतील ओलावा यावर अवलंबून जमिनीच्या तापमानात वाढ होते.
* जमिनीची स्थिती चांगली राहते. आच्छादन अंथरण्यापूर्वी जमिनीची मशागत चांगली केलेली असल्यामुळे आच्छादनाखाली तिची चांगली स्थिती राहते.
* खतांचा निचरा कमी होतो. जमिनीत दिलेली खते निचरा होऊन वाहून जात नाहीत.
* बाष्पीभवन कमी होते. वाफ आच्छादनातून जाऊ शकत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो.
* झाडांवर आणि फळांवर माती उडत नसल्यामुळे पिकाचे उत्पादन स्वच्छ राहते.
* आच्छादनामुळे झाडांना खते, पाणी व्यवस्थितरीत्या मिळते. त्यामुळे मुळे जोमाने वाढतात. काळ्या प्लॅस्टिकमुळे तणांची वाढ नियंत्रित होते.
- प्रा. शशांक दाते (उद्यानविद्या)
- प्रा. शामसुंदर बोर्डे (विस्तार शिक्षण)
कृषी विस्तार केंद्र, जळगाव (जामोद), जि. बुलडाणा

No Comments