सोलापूर जिल्ह्यातील भोसे या गावातील मुळे बंधूंनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दूध व्यवसाय सुरू केला आणि नंतर दुधापासून खवा बनविण्याचा व्यवसायही चालू केला. अखंड मेहनत, व्यवस्थापनाच्या जोरावर पाहता पाहता खवा व्यवसायातून त्यांनी चांगलीच आर्थिक प्रगती साधली. शेतीही सुधारली. दुष्काळी परिस्थितीतही मुळे बंधूंचा हा व्यवसाय जोमाने सुरू आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर मुळे बंधूंचे भोसे गाव आहे. पंढरपूर-अहमदनगर या मार्गावर मुळे बंधूंची शेती आहे. सख्खे आणि चुलत मिळून अशा आठ मुळे बंधूंनी शेतातच आपली वस्ती केली आहे. ‘आपण आणि आपलं काम भलं’ या तत्त्वाने राहणारे मुळे बंधू व त्यांचा परिवार गेल्या तीस वर्षांपासून खव्याचा व्यवसाय करीत आहे. दुधापासून खवा बनविणारी मुळे यांची दुसरी पिढी सध्या या व्यवसायात आहे. खवा बनविण्याचा वारसा त्यांच्या वडिलांपासून चालत आला आहे. या पिढीतील मुळे बंधूंपैकी बहुतेकांचा जन्म १९७२ च्या दुष्काळातच झाला आहे. या पिढीने सुमारे १९८१ साली खव्याचा व्यवसाय सुरू केला. आता तिसरी पिढीही याच व्यवसायात उतरत आहे.
दूध धंद्याचे गणित
दूध व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या भागवत मुळे यांनी दुधाच्या धंद्याचे गणित मांडले. ते असे ः एक गाय दिवसाला सुमारे १० लिटर दूध देते, असे त्यांनी गृहीत धरले. दुधाला १८ रुपये प्रतिलिटर भाव धरला तर त्याचे १८० रुपये मिळतात. वैरण व इतर खुराक मिळून दिवसाला सुमारे ५० रुपये खर्च होतो. औषधोपचार व मजुरीसाठी ४० रुपये खर्च धरल्यास रोज ९० रुपये खर्च होतो. मग एका गाईचे रोज ९० रुपये सुटतात. अर्ध्याला अर्धा नफा मिळतो म्हणून हा व्यवसाय परवडतो. शिवाय, शेतीला चांगले शेणखत मिळत असल्याने ङ्गायदा खूपच आहे. आता जर्सी गाईचा एक किलो खवा बनविण्यासाठी पाच लिटर दूध लागते. त्यासाठी २० रुपयांचे सरपण लागते. सध्या खव्याला १३० रुपये प्रतिकिलो भाव मिळतोय. त्यामुळे खवा बनविल्यावर प्रतिलिटर चार रुपये जास्त भाव मिळतो म्हणूनच आम्ही खव्याचा व्यवसाय करतोय, असे भागवत मुळे यांनी सांगितले.
भागवत मुळे, हरी मुळे, राजाराम मुळे, रमेश मुळे, सुरेश मुळे, सुनील मुळे, वैजनाथ मुळे, दिलीप मुळे हे बंधू खव्याचा व्यवसाय करीत आहेत. गणेश मुळे व स्वप्नील मुळे हे त्यांचे पुतणेही आता खव्याच्या व्यवसायात उतरले आहेत. भागवत मुळे यांच्याकडे एकूण दहा जनावरे असून, यामध्ये पाच जर्सी गाई व चार म्हशी आहेत. त्यांना दररोज सकाळ व संध्याकाळचे मिळून ४० लिटर दूध मिळते. हरी मुळे यांच्याकडे ५ गाई व २ म्हशी आहेत. त्यांनाही दररोज ४० लिटर दूध मिळते. स्वप्नील मुळे यांच्याकडे असलेल्या सहा गाईंपासून त्यांना दररोज ३० लिटर दूध मिळते. राजाराम मुळे यांच्याकडे १३ जनावरे आहेत. यात ९ गाई व ४ कालवडी आहेत. त्यांना रोज ४० ते ५० लिटर दूध मिळते. रमेश मुळे यांच्याकडे ६ गाई व १ म्हैस असून, त्यांना दररोज २५ लिटर दूध मिळते. सुरेश मुळे यांच्याकडे असलेल्या ३ गाईंपासून त्यांना दररोज २० लिटर दूध मिळते. सुनील मुळे यांना ५ गाईंपासून दररोज ३० लिटर दूध मिळते. वैजनाथ मुळे यांच्याकडे ८
गाई असून, त्यांना दररोज ४० लिटर दूध मिळते. दिलीप मुळे यांच्याकडे २ म्हशी व २ वासरे असून, म्हशीचे त्यांना दररोज १० लिटर दूध मिळते. गणेश मुळे यांच्याकडे २ गाई व एक रेडकू असून, त्यांना दररोज १० लिटर दूध मिळते.
मुळे बंधूंची लगबग
सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत मुळे बंधूंच्या घरी खवा बनविण्याची लगबग सुरू होते. जनावरांचे शेण काढून त्यांची धार काढली जाते. त्यानंतर घरासमोरील चुलवानावर लोखंडी कढईत काढलेले दूध ओतून ते घोटले जाते. सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत अशीच लगबग सुरू असते. या काळात त्यांच्या घरी पाहुणा जर आला तरी त्यांना त्याचा पाहूणचार करता येत नाही. दर आठ दिवसाला प्रत्येकी सुमारे ५० किलो खवा तयार होतो.
खव्याची बाजारपेठ व उत्पन्न
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे पेढा तयार करण्यासाठी खव्याला मोठी मागणी असते. येथे गाईच्या दुधापासून बनविल्या जाणार्या खव्याला प्रतिकिलो सुमारे १३० रुपये, तर म्हशींच्या दुधापासून बनविल्या जाणार्या खव्याला प्रतिकिलो सुमारे १४० रुपये भाव मिळतो. मुळे बंधूंकडे दर आठ दिवसाला ५० किलो खवा तयार होतो. त्यापासून सुमारे सहा ते साडेसहा हजार रुपये रोख पट्टी मिळते. वार्षिक सुमारे २ लाख ८० हजार रुपये प्रत्येकी उत्पन्न मिळत आहे. खर्च वजा जाता ङ्गक्त खव्यातून वार्षिक सुमारे १ लाख ४० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळत असल्याचे भागवत मुळे यांनी सांगितले. पंढरपूर येथे दर मंगळवारी व शनिवारी खव्याचा बाजार भरतो. तयार झालेला खवा मुळे बंधू पंढरपूर येथील बाजारात पाठवितात.
खवा व्यवसायामुळे अशी झाली प्रगती
मुळे बंधूंची पूर्वी हलाखीची परिस्थिती होती. यातील काहीजण शेती करायचे तर काहीजण लोकांच्या शेतावर मजुरी करत होते. त्यांनी आता खव्याचा व्यवसाय सुरू
केल्यामुळे खूपच प्रगती झाली आहे. खव्याचे रोख पैसे मिळत असल्यामुळे त्यांची शेती चांगलीच सुधारली आहे. शेतीसोबत दुधाचा जोडधंदा सुरू केल्यामुळे भागवत मुळे यांनी ५ एकर जमीन विकत घेतली. शेतीच्या पाण्यासाठी ६० फूट खोलीची एक विहीर खोदली व उजनी धरणाच्या डाव्या कॅनॉलवरून एक किलोमीटर अंतराची पाईपलाईन केली आहे. त्यांनी चांगले घरही बांधले आहे. हरी मुळे व स्वप्नील मुळे यांनी प्रत्येकी दीड एकर जमीन विकत घेतली आहे. सुनील
मुळे यांनी बंगला बांधला आहे. दिलीप मुळे यांनी शेतात विहीर खोदली असून, गणेश मुळे व रमेश मुळे यांनीही आपापल्या शेतात पाण्यासाठी बोअर घेतले आहे. राजाराम मुळे यांनी उजनी धरणाच्या डाव्या कालव्यावरून एक किलोमीटर पाईपलाईन केली आहे. ही प्रगती पाहता खर्या अर्थाने मुळे बंधूंच्या आयुष्यात खव्याने बरकत आणली आहे.
चार्याची तरतूद
मुळे बंधूंनी आपल्या जनावरांच्या वैरणीसाठी घराजवळच प्रत्येकी एक एकर क्षेत्र राखून ठेवले आहे. त्यात त्यांनी मका व कडवळ अशी पिके घेतली आहेत. ओला चारा कायम उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी दहा-दहा गुंठ्यात त्याची लागवड केली आहे.शेणखतामुळे जमिनी बनल्या सुपीक शेणखत हे शेतीला ङ्गारच उपयुक्त
ठरते. मागेल तेवढे पैसे देऊनही शुद्ध शेणखत सध्या मिळत नाही. मुळे बंधूंकडे लहान-मोठी मिळून एकूण ६६ जनावरे आहेत. त्यापासून त्यांना वर्षाला सुमारे ६५ ट्रॉली शेणखत मिळते. दरवर्षी एका जनावरापासून एक ट्रॉली शेणखत मिळते. सध्या एक ट्रॉली शेणखताचा ५ हजार रुपये भाव आहे. मुळे बंधूंना दरवर्षी सुमारे ३० लाख रुपये किमतीचे शेणखत मिळते. शेतीची गरज भागून उरलेले शेणखत ते विकतात. शेणखतामुळे मुळे बंधूंच्या जमिनी आता सुपीक बनल्या असून, त्यामुळे शेतीचे उत्पादन व उत्पन्न चांगले मिळू लागले आहे.
संपर्क : भागवत मुळे, भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, मो. नं. ९८२२८०४४८३
आमचा जन्मच मुळी भयाण दुष्काळात झालाय…
त्यामुळं दुष्काळाचं आम्हाला कायपण वाटत न्हाय…
त्यानंच आम्हाला जगायला शिकवलं…
हिंमत दिली…त्यानंच तारलं…बरकत दिली…
आत्ताचा आम्ही हा तिसरा मोठा दुष्काळ पाहतोय…
त्याला आम्ही घाबरलो न्हाय…
उलट मोठ्या धीराने त्याचा सामना करतोय…
म्हणून तर आमच्या घरी वाहतेय अखंड दूधगंगा…
गेल्या तीस वर्षांपासून खव्याचा व्यवसाय करणारे
भागवत मुळे सांगत होते.
खव्याचा व्यवसाय सुरू झाल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारली आहे. आम्हाला आता कोणाचेही कर्ज नाही. शेतीला शेणखत मिळाल्यामुळे आमची शेती सुपीक झाली आहे.
- दिलीप मुळे
भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

No Comments