दूध व्यवसायातील ‘चैतन्य’

देवळाली प्रवरा (जि. अहमदनगर) येथील गणेश बाळासाहेब भांड या युवकाने शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने दूध संकलन करण्याचे ठरविले. हे करत असताना स्वत:च्या मालकीचा दूध प्रकल्प असावा, असे स्वप्न पाहिले आणि खडतर परिस्थितीशी संघर्ष करीत अथक प्रयत्नांतून स्वत:च्या शेतवस्तीवर ‘चैतन्य मिल्क ऍण्ड ऍग्रो फार्म’ नावाने हा दूध प्रकल्प सुरूही केला.

एखादा माणूस स्वप्नवेडा असतो. मात्र, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो काहीही करतो. स्वप्नपूर्तीसाठी झपाटल्यागत काम करून स्वत:च्या मालकीचा दूध शीतकरण प्रकल्प उभारलेला अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील गणेश बाळासाहेब भांड हाही असाच एक उमदा तरुण. देवळाली प्रवरा परिसरात मोठ्या प्रमाणात होणारे दूध उत्पादन लक्षात घेऊन गणेश भांड या तरुणाने आपल्या युवा मित्रांच्या साथीने चैतन्य दूध संकलन केंद्र सुरू केले. दररोज हजार लिटर दूध गोळा होऊ लागले. गणेश हा स्वतः ‘निझर्णेश्‍वर डेअरी’ ला दूध घेऊन जाऊ लागला अन् याचवेळी आपला स्वतःचा दूध प्रकल्प असावा, हे स्वप्न त्याने उराशी बाळगले. हे स्वप्न साकार करण्यासाठी तो झपाटल्यासारखा कामाला लागला आणि कठोर मेहनत करून त्याने हे स्वप्न साकारही केले.
गणेश भांड यांनी शेटेवाडी परिसरात आपल्या शेतवस्तीवर स्वत:चा दूध प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या कार्यालयात पाय ठेवल्यानंतर वाटणारदेखील नाही की, आपण एका वस्तीवर आहोत. एकदम चकाचक व प्रशस्त असा ‘चैतन्य मिल्क ऍण्ड ऍग्रो फार्म’ व ‘चैतन्य चिलिंग प्लॅण्ट’ त्यांनी उभारला. हा प्रकल्प उभारताना त्यांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. शेतकर्‍याचा मुलगा उद्योजक बनला अन् त्याने मोठ्या विश्‍वासाने बाजारपेठ काबीज केली. आजही गणेश स्वतः दुधाचे कॅन उचलतो व सुरतपर्यंत दुधाच्या पिशव्या पोहोचविण्यासाठी दुधाच्या टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून जातो, तेव्हा आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
१९९९ साली चैतन्य दूध संकलन केंद्र उदयास आले. गणेश भांड यांनी मित्रांच्या मदतीने ‘चैतन्य डेअरी’ हा भव्य प्रकल्प उभारला. २००९ मध्ये चैतन्य चिलिंग प्लॅण्ट प्रत्यक्षात उभा राहिला. भांड यांनी या प्रकल्पाचे सांडपाणी वापरून त्यांनी शेती फुलवली आहे. गणेश भांड सांगतात की, पूर्वी आमची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. वडिलांची अकरा एकर शेती; परंतु ती असून नसल्यासारखी. वडिलांनी शेतीसाठी कर्ज तर काढलेच होते; परंतु व्याजाने हातउसने पैसेही घेतलेले. कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला होता. आम्ही चौघे भाऊ अन् दोन बहिणी. मी घरात मोठा. शाळेत शिकत असताना हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचो. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मला दहावीनंतर शाळा सोडावी लागली अन् दूध व्यवसाय पत्करला. मी दूध संकलन करायचो तेव्हा माझे वर्गमित्र कॉलेजला जाताना दिसायचे. मला खूप कमीपणा वाटायचा; परंतु करणार काय?

आता हे केले नाही तर आत्महत्येशिवाय समोर दुसरे काहीच नव्हते. मीदेखील कधी कधी हताश होत होतो; परंतु मी मनाशी खूणगाठ बांधली की, एक ना एक दिवस स्वतः दुधाचा प्लॅण्ट सुरू करायचाच! दूध व्यवसायात करिअर करायचे ठरवून मी नेटाने काम करू लागलो. माझी धडपड पाहून काही मित्र माझ्या मदतीला धावून आले. पन्नास मित्रांनी स्वतःजवळचे पैसे मला दिले. मी बायकोचे दागिने गहाण टाकले. बँकांनीदेखील मदत केली आणि मी ‘चैतन्य डेअरी’ व ‘चैतन्य चिलिंग प्लॅण्ट’ सुरू केला. अल्पावधीतच ‘चैतन्य’ ने चांगली प्रगती केली. ‘चैतन्य’ च्या माध्यमातून आता कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो आहे. हे सारे पाहून माझा माझ्यावरच विश्‍वास बसत नाही. २० हजार लिटर्सपेक्षा अधिक दूध पॅकिंग पिशव्यांतून विकले जाते.
औरंगाबाद, नाशिक, पुणे, अहमदनगर, मुंबई, सुरत अशा मोठ्या शहरांत ‘चैतन्य’ दुधाच्या पिशव्या विक्रीसाठी जातात. बाजारपेठेत विश्‍वासाने पत निर्माण झाली. यामुळे आता अनेक हात मदतीला धावून येतात. ‘चैतन्य’ची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. आता दुधाचे उपपदार्थ तयार करण्याचा मानस आहे. आजही आम्ही पाण्याची बचत करतो. ‘चैतन्य’ मधील पाणी आमच्या अकरा एकर शेतीसाठी वापरले जाते. प्रत्येक घरात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून चांगले दूध देण्यासाठी ‘चैतन्य’ पुढे आहे, असे गणेश भांड यांनी सांगितले.

संपर्क : गणेश बाळासाहेब भांड
चैतन्य चिलिंग प्लॅण्ट, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर
मो. नं. ९८८११२११८८

देवळाली प्रवरा परिसरात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दूध व्यवसायासाठी या भागात अनुकूल वातावरण असल्याचे पाहून गणेश भांड यांनी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘चैतन्य मिल्क ऍण्ड ऍग्रो फार्म’ आणि ‘चैतन्य चिलिंग प्लॅण्ट’ ची स्थापना केली. ‘चैतन्य डेअरी’ च्या उत्तम प्रतीच्या गुणवत्तायुक्त दुधामुळे गणेश भांड व ‘चैतन्य’ हे नाव आता चांगलेच लोकप्रिय झाले आहे. चैतन्य डेअरीमध्ये सध्या दररोज ३५ हजार लिटर्सवर दूध संकलन होत आहे. या डेअरीला दूध पुरविणार्‍या शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला भाव देणे व दुधाचे पेमेंट वेळेवर करणे, यास प्राधान्य दिले जाते. भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार करून दूध संकलन क्षमता एक लाख लिटर्सपर्यंत वाढविण्याचा गणेश भांड यांचा मानस आहे. आज ‘चैतन्य’ दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यापुढील काळात दुधापासून दही, लोणी, तूप, पनीर, श्रीखंड यासारखे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याची योजना असल्याचे भांड यांनी सांगितले.

- शिवाजी घाडगे/राहुरी

About the author  ⁄ kanak

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)