आपत्कालीन परिस्थितीतील ऊस व्यवस्थापन

राज्यातील काही भागात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या शेतकर्‍यांनी थोड्याङ्गार प्रमाणावर उपलब्ध असणार्‍या पाण्यावर उसाचे पिक घेतले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत उसाचे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास ऊसाचे चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वाणांची निवड, पाणी व्यवस्थापन
उसाची लागवड करताना इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करणार्‍या को-८६०३२, कोएम-०२६५, को-७४०, कोव्हीएसआय-९८०५ या जातींची लागवड करावी. पाणी देण्यासाठी ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी पाण्याची उपब्धता कमी आहे, अशा ठिकाणी पाणी देताना एक आड एक सरीतून पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी. ऊस पीक वेळोवेळी काढावे यामुळे पाणी तणाला न मिळता पिकाला मिळेल. शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत. उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पाण्याची प्रत्येक पाळी दोन-तीन दिवसांनी वाढवत न्यावी. त्यामुळे पिकाची पाण्याची ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढत जाते.

लागवड, खत व्यवस्थापन
उसाची लागण करताना बेणे दोन तास चुनखडीच्या पूर्ण विद्राव्य स्वरूपातील द्रावणात बुडवून मगच लावावे. लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी सहा टन पाचटचे आच्छादन करून प्रतिटन पाचटासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सुपर फॉस्फेट व एक किलो पाचट कुजविणार्‍या जिवाणूंचा वापर करावा. लागवड करताना ऊस रोपांचा वापर करावा. यामुळे पाण्याची कमतरता भासली तरी रोपे तग धरून राहतील. खतांची शिफारशीत मात्रा देऊन पंचवीस टक्के पालाश खत अधिक द्यावे. पालाश वनस्पतीच्या पर्णरंध्राची उघडझाप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे पानांतून होणार्‍या बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवले जाते आणि मुक्त प्रोलीनचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते. लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर दोन महिन्यांनी आणि दुसरी फवारणी तीन महिन्यांनी द्यावी. जमिनीची पाणीधारण क्षमता वाढावी यासाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा.

पाण्याच्या ताणाचे परिणाम
ऊस पिकाला पाण्याचा ताण पडल्यास पिकावर काही परिणाम दिसतात. पाने बुडख्यापासून शेंड्याकडे वाळत जातात. मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे मुळाद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊन प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे कांड्याची लांबी व उसाची जाडी कमी होऊन वजनात घट येते. उसामध्ये तंतूमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते. सुरू आणि खोडवा उसात फुटव्याचे प्रमाण कमी होऊन तोडणीच्या वेळी गाळण्यालायक ऊस संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते. पूर्व हंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्याची लांबी व जाडी कमी होते.

हंगामनिहाय आपत्कालीन व्यवस्थापन सुरू हंगाम
सध्या उसाची सुरू हंगाम लागवड सुरू आहे. या उसाला एक आड सरीतून पाणी द्यावे. उसाच्या सरीमध्ये बाष्पीभवन कमी करण्यासाठी उसाचे पाचटाचे उपलब्धतेनुसार आच्छादन वापरावे. उसाची बांधणी झालेली नसल्यास बांधणीच्या वेळेस पालाश खताची मात्रा शिफारशीपेक्षा पंचवीस टक्के जास्त द्यावी. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.

खोडवा
राज्यात खोडव्याखाली ३५ ते ४० टक्के क्षेत्र आहे. या उसाला एक आड सरीतून पाणी द्यावे. खोडव्यामध्ये पाचट आच्छादन म्हणून वापरावे. खोडव्यास खत मात्रा पहारीच्या साह्याने शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी. दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.

- डॉ. एस. बी. पवार
विस्तार कृषिविद्यावेत्ता
कृ. वि. शि. कें. औरंगाबाद
मो. नं.९४२२१७८९८२

About the author  ⁄ kanak

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)