अहमदनगर जिल्ह्यात गारपीट

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर व अकोले तालुक्यांत सोमवारी दुपारी गारपीट झाली. सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या पावसामुळे गहू, हरबरा या पिकांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, द्राक्ष, कांदा या पिकांनाही जबरदस्त तडाखा बसला.

दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने एकच धांदल उडाली. संगमनेर तालुक्यातील आश्‍वी, जोर्वे, निमगावजाळी, तळेगाव पट्‌ट्यातील कौठे कमळेश्‍वर, मेंढवण, लोहारे या भागांत तीन तास पाऊस कोसळत होता. सोबत सोसाट्याचा वारा आणि गारपीटही होत होती. या पावसाने गहू, ज्वारी, हरबरा तसेच कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. तालुक्यातील तळेगाव पट्‌ट्यात सर्वाधिक पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील झाडे उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचले. तालुक्याच्या पश्‍चिम पट्‌ट्यातील चिखली, राजापूर, गुंजाळवाडी, घुलेवाडी या भागात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या. पठार
भागातील साकूर व घारगाव या भागांत मात्र पावसाने पाठ फिरविली. अकोले तालुक्यातही जोरदार गारपीट झाली.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात नुकसान
नाशिक (अतुल भांबेरे) : संपूर्ण आठवडाभर ढगाळ वातावरण, कमी-अधिक होणारी उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण यामुळे नाशिक जिल्ह्यात सोमवारी ११ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास वादळीवारा, विजांच्या कडकडटात जोरदार पाऊस झाला. पाऊस झालेल्या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली. या बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम द्राक्ष, कांदा, गहू व आंब्याला बसला. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

या बेमोसमी पावसाने सर्वप्रथम नाशिकरोड, भगूर परिसरात गारांसह हजेरी लावली. यानंतर नाशिक शहरासह पिंपळगावबसवंत, साकोरा, कोकणगाव, मोहाडी, चिंचखेड, शिवडी, कळवण, दिंडोरी, ढकांबे, चांदवड, देवळा या भागांत पावसाने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरासह पिंपळगावबसवंत साकोरा, दिंडोरी या भागांत मात्र या पावसाचे प्रमाण जास्त होते. या पावसाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम द्राक्षाला बसला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षघडांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून अनेक द्राक्ष उत्पादकांनी घडांना वर्तमानपत्राच्या कागदांचे आवरण लावले होते. मात्र पावसाने ते भिजले असून त्याची शाई आता द्राक्षमण्यांना लागली आहे. त्यामुळे अशी द्राक्ष कुणी स्वीकारणार नाही, याची खात्री शेतकर्‍यांना पटल्यामुळे अशी द्राक्ष फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यातच ऊन पडल्यामुळे द्राक्षघडांना लावलेला कागद उष्णता वाढून घड उकडतील असे वातावरण निर्माण करतो आहे.

निर्यातक्षम द्राक्षांपैकी आतापर्यंत केवळ दहा टक्केच माल निघाला असून नव्वद टक्के माल अजून बागेतच असल्याने मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे मात्र जी द्राक्षे भारतातील बाजारपेठेतच विकायची असतात असे द्राक्ष मार्च-एप्रिलमध्ये तोडणीला येणार आहेत, अशा द्राक्षांना मात्र याचा फायदाच होणार आहे. कारण यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने द्राक्षबागांना पाणी देणेही जिकीरीचे झाले होते. त्या द्राक्षबागांना या पावसाचा लाभच झाला आहे, असे द्राक्ष उत्पादक विलासराव बोरस्ते यांनी सांगितले.

कांदा झाला ओला
अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळल्यामुळे जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये विक्रीस आलेला कांदा किरकोळ स्वरूपात ओला झाला तर ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली त्या भागातील कांदापात पूर्णपणे जमिनीवरच झोपली. तर या ढगाळ व कमी-अधिक होणारी उष्णता यामुळे कांद्यावर रोगट तयार झाले आहे. काही कांदे तर जमिनीतच सडले आहेत. त्यामुळे आधीच कांद्याची लागवड कमी असताना अशा परिस्थितीमुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. परिणामी कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता आहे.

गव्हाला फटका
वादळी वारा व गारपीट या सर्वांचाच फटका गव्हाला बसला आहे. हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक आडवे पडल्याने शेतकरी हवालदिल झालेत. काही शेतकर्‍यांचा गहू काढणीला आला होता तर काही शेतकर्‍यांची गहू काढणी सुरू होते. अशा अवस्थेतच गारपीट मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आधीच गव्हाचे क्षेत्र कमी होते त्यात असे नुकसान झाल्यामुळे गव्हाचे दरही येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामात पेरणी झालेल्या गव्हाचे ३५ हजार ६८९ हेक्टर क्षेत्र असून त्या खालोखाल हरभर्‍याचे २६ हजार २३७ हेक्टर क्षेत्र आहे. तसेच द्राक्षपिकाची लागवडही ५३ हजार हेक्टरवर आहे. त्यामुळे रब्बीच्या काढणीला आलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर अंतिम टप्प्यात फळ तयार झालेल्या द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला आहे.

पंधरा एकर द्राक्षबाग उद्ध्वस्त
दिंडोरी तालुक्यताील ढकांबे परिसरात झालेल्या वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. टोलनाक्याजवळील सानप वैभव भिमराव यांच्या नर्सरीत तर गारांचा मोठा खच पडला होता. तर पंधरा एकर द्राक्षबाग उन्मळून उद्ध्वस्त झाली. द्राक्षांना तडे पडल्याने व ती वातावरणामुळे लालसर झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही विक्री योग्य राहिली नाही. त्यामुळे त्यांचे जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

About the author  ⁄ admin

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)