औरंगाबाद (टीम आधुनिक किसान ) : एका बाजूला पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला असताना दुसर्या बाजूला दारूसह विविध कंपन्यांना संरक्षित प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाणी दिले जात आहे. यासंदर्भातील विशेष वृत्त साप्ताहिक आधुनिक किसानच्या ताज्या (अंक क्रमांक ५४) अंकात प्रसिद्ध केले आहे. वाया जाणारे हे पाण्याचे पुढे काय होते? यासंदर्भातील माहिती घेण्याचा हा प्रयत्न.
दारू कंपन्यांमुळे वाया जाणारे पाणी कुठे मुरवतात? याचा शोध घेण्यासाठी आधुनिक किसानची टीम औरंगाबादपासून २० किलोमीटर अंतरावरील कडेगाव येथे पोहोचली. तत्पूर्वी शेंद्रा औद्योगिक वसाहतींतील एका दारू उत्पादन कंपनीत जाऊन आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. तेथील एका कर्मचार्याने सांगितले की कंपनीतून वाया जाणारे पाणी टँकरमध्ये भरले जाते आणि हे टँकर कंपनीच्या बाहेर नेऊन टाकण्यासाठी काही टँकरधारकांना ठेके दिले जातात. ते त्याचे पुढे काय करतात ते आम्हाला माहित नाही.
यावरून औरंगाबाद परिसरात असणार्या दारू कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी कोणत्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता टँकरद्वारे आसपाच्या शेतांमध्ये टाकले जाते अशी धक्कादायक माहिती निष्पन्न झाली. दरम्यान या क्षेत्रातील जाणकारांनी आम्हाला हीच माहिती आधीच सांगीतली होती. मात्र आम्हाला प्रत्यक्ष खात्री करायची होती.
अशी खात्री झाल्यानंतर आम्ही त्या दारू कंपनीतून बाहेर पडणार्या टँकरचाच पाठलाग केला. हे टँकर येथील शेंद्रा आणि चिखलठाणा औद्योगिक वसाहतींच्या जवळ असणार्या कडेगाव मधील शेतात जाऊन कंपनीचे सांडपाणी ओतत असल्याचे आढळले. या पाण्यामुळे येथील शेतजमीनीवर आणि पाणी पुरवठ्यांच्या स्त्रोतांवर काय परिणाम घडतात याची चाचपणी करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
कडेगाव येथे ज्या शेतातमध्ये सांडपाणी ओतले जात होते तेथेच एका शेतकर्याशी आमची भेट झाली. या सांडपाण्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता सुरूवातीला त्याने बोलण्यास नकार दिला. मात्र, त्याचा विश्वास संपादन केल्यावर तो बोलता झाला. हे एमआयडीसीतल्या एका ब्रँडीच्या कंपनीचे पाणी असून गेल्या काही दिवसांपासून आसपासच्या शेतांमध्ये हे पाणी टाकले जात असल्याचे तो म्हणाला. हे सांडपाणी टाकण्यासाठी कंपनीकडून येथील शेतकर्यांना पैसे दिले जातात का असे विचारले असता नाही असे उत्तर मिळाले. हे सगळ सांगताना माझं नाव कुठं यायला नको अशी विनंती तो शेतकरी आम्हाला वारंवार करत होता. या पाण्याचा शेतीला ङ्गायदा होतो की नुकसान याबाबत तो म्हणाला की या पाण्यानं जमिनी चोपण झाल्या असून यावर कोणतेही पिक घेतले जात नाही असे त्याने स्पष्ट केले.
या शेतकर्याकडून माहिती घेतल्यावर आम्ही शेतातून गावात पोहचलो. गावातील काही लोकांशी चर्चा केली तेव्हा दारू कारखान्याच्या मळीचे टँकर येथे येत असल्याचे त्यांनी देखील सांगितले. एक ते दीड महीन्यांपासून आमच्या गावात हे टँकर येत असल्याचे काही गावकर्यांनी सांगितले. येथील ठराविक शेतकरीच या टँकरचे पाणी टाकण्यास परवानगी देत असल्याचे कळाले. दिवसाकाठी एका शेतकर्याच्या शेतात तब्बल आठ ते दहा टँकर ओतले जातात हेही या शेतकर्याने सांगितले. याचा अर्थ स्पष्ट होता, की दिवसाला एका शेतात किमान २ ते अडीच लाख मळीचे पाणी टाकले जाते. अशा किमान १५ ते २० शेतकर्यांकडे असे टँकर येतात. त्यावरून या एकाच गावात किती सांडपाणी बिनबोभाटपणे जिरवले जाते, त्याची कल्पना येईल.
असे पाणी टाकण्यासाठी शेतकरी आणि कंपनीत थेट संपर्क नसतो, तर टँकर चालक या शेतकर्यांशी संपर्क साधून हे पाणी आणून टाकत असल्याचे येथील काही शेतकर्यांनी स्पष्ट केले. या सांडपाण्यामुळे परिसरातील पाणीस्त्रातांचे आणि शेतीचे नुकसान होत असल्याची बाब या ग्रामस्थांनी मान्य केली. गावात सध्या पाण्याची टंचाई असून सांडपाण्याचे टँकर जादा येतात पण चांगल्या पाण्याचे टँकर जेमतेमच टँकर येत असल्याने हाल होत असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले.
प्रक्रिया न करता हे सांडपाणी जमीनीवर सोडल्यास त्याचे काय परिणाम होतात याची माहिती घेण्यासाठी मृदविज्ञान व रसायनशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. सुरेश वाईकर यांच्याशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगिलेल्या गोष्टी धक्कादायक होत्या. बिअर, लिकर यासारख्या कंपन्यातील सांडपाणी एकाच ठिकाणच्या जमिनीवर वारंवार टाकल्यास जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर दुष्परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाण्यात मेणचट पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने जमीन चोपण होण्याची भीती असते. जमीनीत हवा खेळती राहण्यासाठी असणारे छिद्र यामुळे बुजले जातात. यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत पिकांची वाढ होत नाही.
पर्यावरणाच्या कायद्यानुसार या कंपन्यातील पाण्यावर योग्य प्रक्रिया करून जमिनीत केवळ वर्षातून एकदाच टाकण्याची परवानगी आहे. या पाण्यावर योग्य ती प्रक्रीया करून कंपोस्ट खत निर्मितीसाठी त्याचा वापर करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या कंपन्या अशा गोष्टी न करता मळीचे पाणी (प्रक्रिया न केलेले) की ज्याला स्पेंट वॉश असे म्हणतात, थेट शेत जमिनींमध्ये टाकतात. याचे मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया करण्याचा खर्च वाचविणे हे आहे.
एकंदर यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे दुष्काळाच्या काळातही दारूच्या कंपन्या सुरळीत सुरू असून त्या दररोज लाखो लिटर पाणी वापरतात. दुसरीकडे पर्यावरणासह सर्व नियम धाब्यावर बसवून या कंपन्या पाण्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे शेती आणि जमिनीखालील जलस्त्रोतही धोक्यात येत चालले आहेत. विशेष म्हणजे कुठल्याही शासकीय यंत्रणेला याची दखल घ्यावीशी वाटत नाही.
या उलट शेतकर्यांना हेच पाणी जायकवाडीसारख्या धरणातून घ्यायचे असते, तेव्हा त्याला सत्राशेसाठ नियमांचा सामना करावा लागतो आणि जिल्हा प्रशासन त्याच्यावर कारवाईचा बडगा उपसतो, हे चित्र मात्र लोकशाहीमध्ये विषण्ण करणारे आहे.
दरम्यान या स्टोरीसंदर्भात आणखीही काही गोष्टी आम्ही उजेडात आणल्या आहेत. त्याविषयी सविस्तर वाचा येणार्या ‘साप्ताहिक आधुनिक किसानच्या’ अंकात अर्थात प्रिंट व्हर्जनमध्ये.

No Comments