‘आदर्श गाव’ योजनेसाठी सुधारणा समिती

मुंबई, : आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा समिती स्थापन करण्याचे निर्देश रोजगार हमी व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरुन डॉ. राऊत बोलत होते.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईची समस्या कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने जलसंधारणाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ. नितीन राऊत म्हणाले की, आदर्श गाव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून रोहयो तसेच अन्य योजनांप्रमाणे या योजनेचेही देशात अन्यत्र अनुकरण केले गेले पाहिजे. यादृष्टीने या योजनेत काही सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या निवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सुधारणा समितीची स्थापना करणे आणि कार्याध्यक्षाला राज्यमंत्र्यांचा दर्जा देणे याबाबींची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.

आदर्श गाव योजनेसाठी दरवर्षी संपूर्ण राज्यात एकूण 100 गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे, या योजनेत मनरेगा आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्त, व्यवस्थापन शास्त्र तसेच समाजसेवा, वित्तीय व्यवस्थापन या क्षेत्रातील लोकांचा सहभाग घेण्यात यावा असेही डॉ. राऊत यांनी सुचविले. या कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांची लोकसंख्या 4 हजारावरुन 10 हजारापर्यंत करण्याबाबतही चर्चा करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

आदर्श गाव योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी प्राईमुव्ह या संस्थेला मान्यता देऊन याबाबतचा अहवाल 3 महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी संबंधितांना दिले. आदर्श गाव समितीने स्वत:चे अंदाज पत्रक तयार करावे, आदर्श गाव बाबतच्या निकषांमध्ये बदल करण्यात यावा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आदर्श गाव योजनेसाठी एक कक्ष निर्माण करण्यात यावा तसेच या योजनेत अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीत लोक कार्यक्रमात शासनाचा सहभाग, अंमलबजावणीची पध्दत, नवीन गाव निवडीचे निकष, गाव निवडीचे प्राधान्यक्रम, स्वयंसेवी संस्था, संस्था निवडीचे निकष, सामाजिक अंकेक्षण योजनेची सद्यस्थिती, सनियंत्रण व मूल्यांकन, राज्यस्तरीय समितीची कार्यकक्षा, प्रशिक्षण केंद्र, गावातील सामजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्याबाबतचे धोरण इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस रोहयो व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, सामाजिक वनीकरण महासंचालक सुरेश थोरात, समितीचे अन्य सदस्य व वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

About the author  ⁄ rahul

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)