द्राक्ष पिकाच्या उत्पादन व प्रतीवर परिणाम करणार्या प्रमुख घटकांपैकी त्यावर आढळणार्या किडी हे एक महत्त्वाचे कारण आहे. द्राक्षाचे
दर्जेदार उत्पादन घेण्याच्या दृष्टीने त्यावर येणार्या किडींचे खरड (एप्रिल) छाटणीपासूनच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
खरड छाटणीनंतर (एप्रिल) द्राक्ष पिकावरील कीड व्यवस्थापन हे ऑक्टोबर छाटणीनंतरच्या शाश्वत फळधारणेसाठी व प्रभावी कीड व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे खरड छाटणीपासूनच (एप्रिल) कीड व्यवस्थापन प्रभावीपणे व योग्य पद्धतीने केल्यास ऑक्टोबर छाटणीनंतर उद्भवणारा किडींचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो.
द्राक्ष पिकावरील किडींचे व्यवस्थापन
खोडकीड
राज्यात शेलास्टर्ना स्काब्राटर आणि स्ट्रेमॅशियम बार्बाटम या खोडकिडींच्या दोन प्रमुख जाती आढळतात. उष्ण व कोरडे हवामान, पाण्याची कमतरता, द्राक्ष खुंटाचा वापर करताना झालेल्या चुका आणि खोड व ओलांड्यावर झालेल्या जखमा आदी कारणांमुळे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. खोडकिडींच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या खोड किंवा ओलांड्यावरील जखमेच्या ठिकाणी पोखरण्यास सुरुवात करतात. पोखरलेल्या खोड किंवा ओलांड्यावरील वेलीची पाने प्रथम पिवळी दिसू लागतात आणि नंतर या पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यासारखी लक्षणे (पिवळसर तपकिरी चट्टे) दिसू लागतात. कालांतराने अशा वेली किंवा ओलांडे मरतात. खोडात किंवा ओलांड्यात अळी असल्यास अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर येत असतो. ज्या द्राक्ष बागेची लागवड स्वमुळावर केलेली आहे, अशा ठिकाणी या किडींचा अधिक प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. या किडींच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाचे मणी आकाराने बारीक राहणे, घड सुकणे, घडाचे वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना
खरड छाटणीनंतर खोड आणि ओलांड्यावरील मोकळी झालेली साल काढून गेरू तीन किलो अधिक मिथेमिल ४० टक्के ३० मि. लि. अधिक डायक्लोरव्हॉस ३५ मि. लि. अधिक १५ मि. लि. स्टिकर प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात खोड तसेच वलांड्यावर पेस्टिंग करावे. खुंटावर कलम करतेवेळी कट केलेल्या फुटव्यांवर/खुंटावरदेखील पेस्टिंग करणे आवश्यक आहे. द्राक्ष बागेत खोडावर तसेच वलांड्यावर जखमा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जखमा असल्यास/झाल्यास खोड तसेच वलांड्यावर १ ः १ या प्रमाणात कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि कार्बारील यांचे पेस्टिंग करावे. खोड व वलांड्यावरील खोडकिडीने केलेली छिद्रे तारेच्या सहाय्याने मोकळी करावीत व अशा छिद्रात पिचकारीच्या सहाय्याने डायक्लोरव्हॉस ८० मि. लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून हे द्रावण प्रत्येक छिद्रात २० मि. लि. सोडून छिद्र चिखलाने हवाबंद करावीत अथवा पेट्रोल किंवा मिथील ब्रोमाईड किंवा कार्बनडाय सल्फाईड किंवा डायक्लोरव्हॉस इंजेक्शनद्वारे प्रत्येक छिद्रात ५ मिली टाकून छिद्रे चिखलाने हवाबंद करावीत. ज्या बागेमध्ये या किडींचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या बागेत खरड छाटणीनंतर उरलेला पालापाचोळा व इतर अवशेषांचे मल्चिंग करू नये व हे अवशेष पाऊस पडण्यापूर्वीच नष्ट करावेत. खोडांमध्ये/वलांड्यामध्ये इंजेक्शन देऊन खरड छाटणीनंतर या किडीचा बंदोबस्त करणे अवघड जाते. त्यामुळे मे-जून महिन्यात या किडींचा बंदोबस्त करण्याची योग्य वेळ आहे. निंबोळी तेल १ मि. लि. अधिक डिंक १ मि. लि. अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० डब्ल्यूपी १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून घ्यावे. हे द्रावण वेलीवरील मोकळी झालेली साल काढून टाकल्यानंतर अशा वेलींना, खोडांना व फांद्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात लावावे. जून-जुलै महिन्यात द्राक्ष बागेजवळ हेक्टरी २ ते ३ प्रकाश सापळे लावावेत. या प्रकाश सापळ्यांमध्ये आकर्षित झालेले भुंगेरे गोळा करून ते रॉकेल मिश्रित पाण्यात नष्ट करावे.
उडद्या भुंगेरे
या किडीच्या मादी भुंगेराने घातलेल्या अंड्यामधून बाहेर पडणार्या अळ्या मुळ्यांचा मऊ भाग खातात. त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडतात आणि गळतात. नवीन भुंगेरे सुरुवातीस निळसर रंगाचे दिसत असून, ते तांबूस रंगाचे होतात. प्रौढ भुंगेरे लालसर तपकिरी रंगाचे असून, त्यांच्या पंखावर ठिपके असतात. प्रौढ भुंगेरे नवीन फुटलेले डोळे, कोवळे शेंडे, बाळ्या व पाने तसेच काही वेळेस घडदेखील खातात. नवीन डोळे फुटतानाच खराब केल्यास ते वाळून जातात. ही कीड नवीन वाढ होणार्या कोवळ्या फुटीवर, सालीवर ओरखडते. यामुळे कोवळ्या फुटीवर पांढर्या रंगाच्या रेषा दिसतात आणि काही काळाने त्यांचे तपकिरी डागांमध्ये रूपांतर होते. काही वेळेस कोवळी फूट जास्त खराब झाल्यास गळून पडते.
रासायनिक पद्धत
उडद्या भुंगेर्याची अळी अवस्था जमिनीत असते. म्हणून प्रत्येक वेलीच्या खोडाजवळ कुदळणी करून मेलॅथिऑन ५ टक्के २० ग्रॅम प्रति वेल मातीत मिसळावे.

उपाययोजना
वाळलेली आणि खाली पडलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. जमीन स्वच्छ केल्यास किडींच्या अळ्या आणि कोष सूर्यप्रकाशात येतील. खरड छाटणीनंतर मोकळी झालेली साल काढून टाकावी आणि साल काढलेल्या खोड व ओलांड्यावर कॉपर ऑक्झिक्लोराईड २० ग्रॅम अधिक कार्बारील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात एकत्र मिसळून तयार झालेली पेस्ट लावावी. डायक्लोरव्हॉस १० मि. लि. किंवा क्लोरोपायरीफॉस
२० मि. लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आठ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. छाटणी केलेल्या ठिकाणी, ओलांड्यावर व खोडावर केळीची सुकलेली साल बांधावी व त्यावर रात्री बसणारे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. निमतेल किंवा निमअर्क प्रति लिटर पाण्यातून ०.३ टक्के (५ मि. लि.) फवारावे.
फुलकिडे
द्राक्ष पिकास हानीकारक ङ्गुलकिड्यांच्या प्रमुख जातींमध्ये स्फीरोथ्रीप्स डॉरसॉलीस, थ्रीप्स हवाइनसीस, हिपोङ्गोराथ्रीप्स कु्रदनटाटीस यांचा समावेश होतो. पिल्ले व प्रौढ फुलकिडे ओरखडे ओढून पानांतून तसेच मण्यांतून निघणार्या रसाचे शोषण करतात. यामुळे कोवळ्या पानांच्या कडा करपतात. पानांचे शेंडे वाकडे होतात आणि खोलगट आकार येतो. इजा झालेला भाग चंदेरी ठिपक्यांसारखा दिसतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे मण्यांवर खपली आढळून येते व मण्यांचा पृष्ठभाग खडबडीत होऊन त्यांचा रंग तपकिरी होतो. द्राक्षवेल फुलोरा अवस्थेत असताना ही कीड मण्यास छिद्र पाडून त्यातील रस शोषण करते. परिणामी मणी व घडनिर्मिती योग्य प्रकारे होत नाही. फुलकिड्यांची संख्या फुलोर्याच्या वेळी जास्त असते. सर्वात जास्त फुलकिड्यांची संख्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आढळते. प्रादुर्भाव झालेल्या वेलीवरील फळे कमी गुणवत्तेची असतात व अशा फळांना बाजारात मागणी नसते.
उपाययोजना
पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट पट्ट्यांच्या सापळ्यांचा वापर केल्यास फुलकिडे त्याकडे आकर्षित होऊन त्यावर चिकटतात व नियंत्रण होते. सापळे झाडाच्या उंच भागावर लावावेत. व्हर्टिसिलीयम लेकॅनी किंवा बिव्हेरिया बॅसीयाना यांचे द्रावण ५
मि. लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात तापमान २० ते २५ अंश से. व आर्द्रता ८० टक्क्यांपेक्षा जास्त असताना फवारावे. समतोल व शिफारशीप्रमाणेच नत्रयुक्त खतांचा वापर आणि ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- प्रा. चांगदेव वायळ
मो. न. ७५८८०१६४८४
दू. क्र. (०२५५०) २५०३०५
(लेखक हे पिंपळगाव बसवंत (ता. निङ्गाड, जि. नाशिक) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.)
Read More →