दूध मुबलक नाही म्हणून ग्राहक सांगतो. दूध उत्पादन पुरेसे नाही म्हणून सरकार योजना राबविते. दुष्काळात दूध उत्पादनात घट होतेय, असे चिलिंग प्लँट व्यावसायिक सांगतात. प्रत्यक्षात दुधाचा पुरवठा अतिरिक्त आहे म्हणून शेतकर्‍यांचे दूध विकत न घेणे, त्यांना भाव कमी देणे असे उद्योग खासगी दूध कंपन्या आणि दुधाचे दलाल करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्याला रास्त दूध दराची प्रतीक्षा आहे. या सगळ्यामागचे वास्तव काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय ‘आधुनिक किसान’ने.

नगर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत कुकडी धरणातून पाण्याचे लोट आणण्याची लोकप्रिय घोषणा ठरलेली. वर्षानुवर्षे या अवर्षणप्रवण तालुक्याने याच मुद्यावर नेत्यांना मोठे केले. नेत्यांनीही तरुणांना कामाला लावणार्‍या उद्योगांपेक्षा निवडणुकीसाठीचे ङ्गंडे वापरून राजकारणाच्या ङ्गडात रंग भरून उखळ पांढरे करून घेतले. त्यापैकीच एक राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले गाव म्हणूनही रेल्वेचे स्टेशन असणार्‍या सारोळा कासारचा उल्लेख करावा लागेल.
या गावातील हजार एकर पडिक
जमिनींसह शेजारील घोसपुरी, चिखली, हिवरे झरे या गावांतील जमिनींसाठीही नगर व पुणे-मुंबईतील गुंठामंत्र्यांच्या चकरा ठरलेल्या असतात. गावातील अनेकजण शेतीला कंटाळल्याने एमआयडीसी किंवा कशातही जमिनी गेल्यानंतर मिळणार्‍या पैशांची चातकासारखी वाट पाहतात. मात्र, तरीही काही शेतकरी दुष्काळावर मात करण्याचा चंग बाधून शेतीसह पशुपालनाचा धंदा करून टामटुमीत जगताना याच गावात दिसतात. या गावाला रेल्वेचा परिसस्पर्श लाभल्याचाही मोठा ङ्गायदाच झाला आहे. कारण मागील तीस वर्षांत सहकारी दूध डेअर्‍यांना बरकत असतानाही सारोळकर शेतकरी सकाळच्या पुणे-मनमाड पॅसेंजर गाडीतून नगरला दुधाचे रतीब घालण्यासाठीच जात होते. काळानुरूप मोटारसायकलींचा घरोघर राबता वाढल्याने आता मोजकेचे दुग्धोत्पादक शेतकरी रेल्वेने नगरला दूध देतात. आता गावातील दूध टँकरने थेट पुणे शहरातील मगरपट्टा सिटीतील उच्चभ्रू वस्तीची भल्या सकाळी चहाची लज्जत वाढवीत आहे.
सारोळकरांचा दिवस भल्या पहाटेच सुरू होतो. दहा वर्षांपूर्वी तर सहकारी व शासकीय डेअर्‍यांची चलती असताना दूधवाल्यांना पहाटे तीनलाच उठून कामाला जुपून घ्यावे लागत. आता निवांत सहाला उठले तरी चालते. कारण खाजगी प्लँटवाल्यांच्या दूध संकलनाच्या गाड्या थेट शेतकर्‍यांच्या घरांपर्यंतही येऊ लागल्या आहेत. गावातील ६० टक्के शेतकर्‍यांकडे म्हशी असून म्हशीचे दूध थेट नगरकरांना रतिबाने देण्यातच मोठा ङ्गायदा होत असल्याचे पशुपालक शेतकरी संजय खेंगट सांगतात. ते म्हणाले की, आम्ही डेअरीला म्हशीचे दूध घातल्यास वीस रुपये लिटरचा भाव मिळतो, तर थोडे कष्ट घेऊन मोटारसायकलद्वारे नगरला जाऊन रतीब घातल्यास ३५ ते ४० रुपये लिटरचा भाव मिळतो.

गावातील उच्चशिक्षित तरुण सागर गुलाबराव काळे यांनी घेतलेल्या पुढाकाराने काळाबरोबर चालत येथील दूध उत्पादकांनी खाजगीकरणातून उदारीकरणाकडेही वाटचाल केली आहे. याविषयी काळे सांगतात की, मागील वीस वर्षांपासून मी गावातील शेतकर्‍यांना सहकारी डेअर्‍या व रतीब घालताना पाहतोय. काळानुरूप झालेल्या बदलातून सहकारी डेअरीला घरघर लागल्याने आमच्या दुष्काळी तालुक्यात खाजगी डेअर्‍या सुरू झाल्या. परिणामी, शेतकर्‍यांना दूध विकण्याचे पर्याय मिळाले. पण, त्याचवेळी जागतिक बाजारातील न्यूझिलंड, नॉर्वे, स्वीडन आदी देशांतील दुधाची पावडर व दुग्धजन्य पदार्थांनी
मोठ्या शहरातील मार्केटवर कब्जा केल्याने आपल्याकडे अजूनही शेतकर्‍यांना चांगला भाव मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. थंड प्रदेशात होलस्टन ङ्ग्रिजिअन, जर्सी यांसारख्या गाई भरपूर दूध देतात. त्याच गाई आपल्याकडील उष्ण हवामानामुळे तत्काळ आजारांना बळी पडतात. परिणामी, आपल्याकडे अजूनही संकरित गाईंंची टक्केवारी कमीच ठेवावी लागत आहे. कमी टक्केवारीमुळे दुधाच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होणे साहाजिकच आहे.
हवामानासह दुष्काळही शेतकर्‍यांची पाठ सोडत नसल्याने आपल्याकडे दूध धंद्याला अजूनही चांगले दिवस येण्याची वाट पाहावी लागतेय. आम्ही पुण्यात दूध नेण्यास सुरुवात केल्याने गावातील शेतकर्‍यांचाही ङ्गायदा झाला आहे. सध्या पुण्यात तीन तर नगरमध्ये दोन हजार लिटर दूध कोणतीही प्रक्रिया न करता विकले जात आहे. लवकरच गावच्या दुधाच्या ब्रँडने प्रक्रिया न केलेल्या स्वच्छ दुधासह होमोजिनाईज्ड व पाश्‍चराईज्ड दुधाच्या पॅकिंग केलेल्या पिशव्या विकण्यासाठीचे युनिट टाकण्यासाठी आम्ही गावकरी प्रयत्नशील आहोत.

येथील पशुपालक मुकिंदा धामणे सांगतात,‘‘माझ्या वडिलांनी दुधाच्या धंद्यावरच आम्हा भावंडाना मोठं केलं. सोसायटीच्या डेअरीत दूध घालतानाच
आमचं शिक्षण झालं अन् अजूनही दूध काढूनच जगतोय. किराणा दुकानात असलेल्या वाणसामानाचे रेट सहा महिन्यांत वाढताना पाहतोय. त्यामुळं किराणा
सामानाच्या यादीचा आकडाही वाढतोय. पण, याचवेळी आमच्या शेतीतून पिकलेल्या मालाबरोबर दुधाचा भाव वाढण्यापेक्षा दुष्काळातही कमीच झालाय. नेमकं कोणतं गणित लावून सरकार आमच्या दुधाला पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी भाव देतं, याचंच आम्हाला कोडं पडलंय.’’
पशुपालक आणि शेतकरी असलेले संदीप जाधव म्हणाले, ‘‘आम्ही दहा वर्षांपासून जर्सी गाईच्या दुधाचा धंदा करतो. पाच वर्षांपूर्वी गावात असलेल्या सोसायटीत कमी भावातच दूध घालायचो. ती बंद पडून खाजगी चिलिंग प्लँटवाल्यांच्या संकलन केंद्रांना सुरुवात झाल्यावर पहिली तीन वर्षे चांगली गेली; पण आता सरकारने भाव कमी केल्याने व त्यातच खाजगीवाल्यांनी मनमानी केल्याने आमची गोची होतेय. नगरच्या एमआयडीसीत असलेल्या डेअर्‍यांनी अनेकदा जास्तीचे दूध आल्याने फगॅट किंवा डिग्री कमी असल्याची बतावणी करून दुधाचे कॅन मागे पाठवलेत. या धंद्यावरचे सरकारी नियंत्रण ङ्गक्त भावापुरतेच असल्याचा हा परिणाम आहे. सरकारबरोबरच खाजगीवाले आमच्या दुधाला वाली नसल्यासारखेच दिसतेय.’’

डॉ. श्रीकांत देशपांडे हे येथील खासगी पशुचिकित्सक आहेत. गावात होणार्‍या दुग्धक्रांतीचे आणि त्याअनुषंगाने होणार्‍या परिणामांचे ते अनेक वर्षांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे यासंदर्भात ते अभ्यासूपणे भाष्य करतात. ते म्हणतात,‘‘ दुधाचा धंदा म्हणजे मोठी तारेवरची कसरत असते. आपल्याकडील गावरान, खिलार व सिंधी गाईंना कमी दूध येते, तर जर्सी गाईंना चांगले दूध येऊनही आजारावरील औषधांचाही खर्च मोठाच असतो. मग या त्रांगड्यात अडकलेल्या पशुपालक शेतकर्‍यांना या जोडधंद्यातून अनेकदा तोटाच होतो. जागतिक मार्केटचा परिणाम थेट दिसत असल्याने आपल्याकडील दुधाला अजूनही कमीच भाव मिळतो. रोजचा वैरण-पाण्याचा खर्च आता दुष्काळात वाढला आहे. त्यामुळे एका लिटरसाठी सरासरी शेतकर्‍यांना मजुरीसह वीस ते बावीस रुपयांचा खर्च होत आहे, तर बाजारभावानुसार ङ्गक्त पंधरा लिटरचा भाव मिळत असल्याने काबाडकष्ट करून जगविलेल्या जनावरांकडून आता या शेतकर्‍यांना फुकटातच ही कसरत करावी लागत आहे.’’
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या नाकावर टिच्चून सारोळकरांनी ‘धवलक्रांती’ केली आणि स्वत:चा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नांतून आता या गावातील दूध थेट पुण्यासारख्या शहरात जात आहे. मात्र, शासकीय पातळीवर मिळणारे कमी दर आणि खासगी दूध प्लँटवाल्यांची मनमानी यामुळे गावकर्‍यांचा दुधव्यवसाय अडचणीत आहे. एकीकडे दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणारे शासन, शेतकर्‍याला, पशुपालकाला मिळणार्‍या कमी दूध दराबाबत काहीच पुढाकार घेताना दिसत नाही. त्यातून शेतकर्‍यांच्या मनोधर्यावर परिणाम होत असल्याची टिप्पणी गावातील जाणकार करत आहेत. दुसरीकडे पशुपालकही दूध दरासंदर्भातील वाढीची मागणी करत आहेत. त्यांना योग्य भाव मिळाला तरच सारोळा सारखी अनेक गावे दुधव्यवसायाच विश्‍वासाने पुढे येतील आणि खर्‍या अर्थाने धवलक्रांतीचे सरकारचे स्वप्न साकार होईल.

काय आहे गौडबंगाल?
वर्षापासून मी नगरमध्ये दुधाचे रतीब घालतोय. मागील वर्षी गावातील खासगी डेअरीच्या संकलन केंद्र चालकाने सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा प्रतिलिटर २ रुपयांचा भाव कमी दिला. यावर दुसर्‍या डेअरीकडे दूध घालणे सुरू केले.केले. पण, त्यानेही एकाच महिन्यात मला कमी भाव झाल्याचे सांगितले. मी त्यास विरोध दर्शिवाल्याने सलग दोन दिवस माझे दूध कमी फॅटचे असल्याचे कारण देऊन दूध मागे पाठविले. त्यानंतर मी डेअरीकडे दूध पाठविणे बंद केले आणि थेट नगर शहराच्या सावेडी भागात रतीब घालण्यास सुरुवात केली. खासगी डेअरीवाले मला १८ रुपयांचा भाव देण्यास तयार नव्हते पण रतिबाने मला ३० रुपयांचा भाव मिळतोय. आताही सरकारने भाव कमी केले आहेत. सरकार दुधाचे उत्पादन
जादा असल्याचे सांगून भाव कमी करीत असल्याचे गौडबंगाल आम्हा शेतकर्‍यांना अजूनही समजलेले नाही. पिशव्यांची पॅकिंग करताना कस काढलेल्या दुधाला तीस लिटरचा भाव सरकार देत असतानाच दूध उत्पादक शेतकर्‍यावर सर्रास अन्याय होत आहे. दुधाला आता सरकारने २५ ते ३० रुपयांचा फिक्स भाव देण्याची गरज आहे.
- संजय खेंगट, पशुपालक शेतकरी
मो. ९७३०५६९९५१

जादा भाव देणे परवडत नाही
शेतकर्‍यांचा दुधाचे भाव कमी झाल्यावर होणारा संताप मान्य आहे. मात्र, जागतिक बाजारातील आयात केलेल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती आपल्याकडील दुधापेक्षा कमीच असतात. परिणामी, इच्छा असूनही आम्ही खासगीवाले
जास्त भाव देऊच शकत नाही. दुष्काळाने दूध कमी संकलित होत असले तरी, आयातीत दूध भुकटीमुळे भाव वाढलेले नाहीत. परदेशी कमी भावाच्या दूध पदार्थांचा हा परिपाक आहे. दुष्काळाने पिचलेल्या शेतकर्‍यांना दुधाचा जोडधंदा चांगला आहे. मात्र, त्यातील काही शेतकरी आम्हा प्लँटवाल्यांकडून मोठ्या रकमेच्या उचली घेऊनही बुडवितात. त्यामुळे यात मोठी रिस्क असते.
- सुरेश सुंबे, संचालक, प्रियदर्शिनी डेअरी, अहमदनगर, मो. ९३२६१५१०७९

- सचिन चोभे / अहमदनगर

Read More →

ठिकाण : डीएसके विश्‍व, उच्चमध्यमवर्गीय सोसायटीचा परिसर, पुणे.
सुमारे ४००० फ्लॅटधारक असलेल्या या सोसायटीत दररोज पहाटे साडेपाचलाच विविध दूध कंपन्यांच्या गाड्या येतात आणि सकाळी सातपर्यंत दूध वाटप झालेलेही असते. बर्‍याच नामांकीत कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या सकाळी आठलाच संपलेल्या असतात. सायंकाळी सातच्या सुमारास जर दूध पाहिजे असेल, तर मोठ्या मुश्किलीने येथील दुकानांमध्ये दूध मिळते. नाहीतर थेट जवळच दोन किलोमीटरवर असलेल्या धायरी गावात किंवा ७ किलोमीटर अंतरावरील सिंहगड रोडची दुकाने येथील लोकांना धुंडाळावी लागतात. शनिवार,रविवारी तर अतिरिक्त दुधासाठी आगाऊ मागणी नोंदविल्यावरच दूध उपलब्ध होत असल्याचे येथील रहिवासी सांगतात.
पुणे शहरासह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दूध विक्रीचे हेच चित्र सर्रास दिसते. मागणी आहे; पण पुरवठा कमी पडतो, असे येथील दूध विक्रेते आणि दुकानदार सांगतात.

ठिकाण : सुपे, ता. पारनेर, औरंगाबाद-पुणे राज्यमार्गावरील महत्त्वाचे गाव.
हमरस्त्यावर असल्याने या गावाला बर्‍यापैकी व्यापारी महत्त्व आले आहे. त्यामुळे येथे आता काही उद्योगांनीही बस्तान बसविलेले दिसते. त्यापैकीच एक आहे दूधप्रक्रियेचा उद्योग. परिसरातील शेतकर्‍यांकडून दूध घ्यायचे, चिलिंग प्लँटमध्ये त्यावर प्रक्रिया करायची आणि दुधाच्या पॅकिंग करणार्‍या नामांकीत खासगी कंपन्यांना हे दूध पुन्हा विकायचे, असे या उद्योगाचे स्वरूप आहे. सध्या या व्यवसायावर दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट असून गेल्या दोन महिन्यांत आपल्याकडे येणारा दूधपुरवठा तब्बल १० हजार लिटरने घटला असून, येणार्‍या काळात तो आणखी कमी होईल, असे एका दूधप्रक्रिया उद्योजकाने सांगितले.

ठिकाण : पारनेर तालुक्यातील सुपे गावाजवळच असणारे एक दुष्काळी गाव.
खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाने या गावातील शेतकर्‍यांना दगा दिला असला तरी ते टिकून आहेत केवळ दुग्धव्यवसायावर. रोज ४ हजार लिटर दुधाचे उत्पादन गावात होते. सहकारी दूध संघ किंवा खासगी कंपन्यांमार्फत या दुधाची विक्री होते. मात्र, त्यातही त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी कंपन्या अनेकदा शेतकर्‍यांना १४ ते १५ रुपयेच भाव देतात. कधी कधी दूध अतिरिक्त असल्याचे कारण पुढे करून दूध विकत घेण्याचेच नाकारतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. असे प्रसंग अनेकदा घडत असल्याचे येथील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. दुष्काळात दूध व्यवसायाने त्यांना हात दिला असला तरी दूध कंपन्यांच्या धोरणामुळे त्यांच्यासमोर अडचणीच उभ्या राहात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ठिकाण : मंत्रालय, मुंबई, मंत्रिमंडळाची बैठक
राज्यातील दूध उत्पादन वाढावे, दूध व्यवसायाला चालना मिळावी आणि त्यातून शेतकर्‍यांचेही राहणीमान सुधारावे, यासाठी मंत्रिमंडळाने नुकतीच दुग्धविकासाची योजना जाहीर केली आहे. राज्यातील गाई-म्हशींची उत्पादकता वाढविणसाठी ‘सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम’ असे या राज्यस्तरीय योजनेचे नाव आहे. पशुधन विकासासाठी वेळ पडल्यास परदेशी वळूचे गोठवलेले वीर्य आयात करण्याची तरतूद या योजनेत आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना राबविण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दुधाचे उत्पादन कमी असल्यामुळेच ही योजना गेल्यावर्षीपासून राबविण्यात येत आहे.

Read More →

राज्यात नुकतीच जनावरांची जनगणना झाली असून दुभत्या जनावरांच्या संख्येत साडेनऊ टक्के वाढ झाली असून दूध उत्पादनातही सुमारे 20 लाख लीटर एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे दुधाळ जातींच्या जनावरांची पैदास करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांनी यांनी सन 2012-13 च्या पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना दिली.

Read More →

पुणे ( विशाल केदारी ) : मजूर टंचाईच्या वाढत्या समस्येमुळे किसान प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी यांत्रिकरणाच्या स्टॉलवर शेतकर्यांची गर्दी वाढली आहे. फोगर्स इंडियाच्या वतीने दोनशे रुपयांपासून फवारणी यंत्र प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे. या स्टॉलवर शेतकर्यांनी गर्दी केली होती. पडगीलवार कंपनीच्या वतीने चारा बनवण्याचे यंत्र या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.

Read More →

एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा जवळपास ५४ टक्के वाटा आहे. अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे फायद्याचे आहे. उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे व जास्त तापमानामुळे जनावरांनाही उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात म्हशींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Read More →

पशुपालनाचा व्यवसाय करणार्‍यांसाठी दिल्ली येथील इंडियन डेअरी इक्वीपमेंट कंपनीने नुकतेच स्टेनलेस स्टीलचे दुधाचे कॅन बाजारात उपलब्ध केले आहे. हे कॅन ५, १०, २०, ४०, व ५० लिटर या आकारात उपलब्ध आहे. कॅनच्या निर्मितीसाठी आयएसआय टे्रडमार्क असलेले ३०४ व ३०२ स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे. प्लॅस्टिक व ऍल्युमिनियम या प्रकारात देखील या कंपनीचे कॅन उपलब्ध आहेत. *

Read More →