‘मले काम धंदे नाही वाटते. जसे काही तुम्हालेच गडबड आहे, कामधंद्याची. अडी बोल्याचे काय सरकार पैसे देत नाही. काही हौस नाही तुम्हाले शेतीतले अनुभव सांगायची. ऐकायचे अशीन त् ऐका नाहीत उठा.’ हे बोल कुण्या रांगड्या पुरुषाचे असावेत, असे वाटते. मात्र, अस्सल वर्‍हाडी भाषेतील हे बोल आहेत पौर्णिमाताई सवई या प्रगतिशील शेतकरी महिलेचे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शेतीत पुरुषच नाही, तर महिलाही तेवढ्याच ताकदीने भरारी घेऊ शकतात हे सिद्ध केलेे आहे. पुरुषांचा दबदबा आपण सर्वच क्षेत्रात बघतो. त्याला शेतीही अपवाद नाही. मात्र, पौर्णिमाताईंनी शेतीतही महिला कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात समोर बसलेल्या शेतकर्‍यांचा गोंधळ सुरू होता. व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाने या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव काही शांत होईना. यावेळी पौर्णिमाताई स्वत: व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांनाही आयोजकांनी ‘ताई फक्त पाच मिनिटे बोला व भाषण आटोपते घ्या,’ असा सल्ला दिला. पौर्णिमाताई उठल्या आणि व्यासपीठावरून अस्सल वर्‍हाडी भाषेत व रांगड्या शैलीत उपरोक्त निवेदन करताच उपस्थित जमाव शांत झाला. ताईंनी पाच मिनिटांऐवजी दीड तास भाषण दिले. तेव्हापासून हा आवाज व्यासपीठावरूनच नाही, तर शेतातल्या बांधावरून, शेतकर्‍यांच्या घराघरांतून घुमतो आहे. ‘पोरी, पुढे शिक्षिका होऊन भरारी घे…’ हेे वडिलांचे शब्द नेहमी स्मरणात ठेवत पौर्णिमाताईंनी शेतीतल्या शिक्षिकेच्या भूमिकेतून गगनभरारी घेऊन दाखविली आहे. आज त्यांच्या शेतात लागवडीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत, काढणीपासून ते बाजारात नेईपर्यंत सर्व कामे पौर्णिमाताई सांभाळतात. शेतातील वेगवेगळे प्रयोग, गांडूळ खताचा उत्पादन प्रकल्प, दुुग्धव्यवस्थापनाचा व्यवसाय या सर्वांचे व्यवस्थापनही त्याच बघतात.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात नेरसोपंत येथे शेतकरी कुटुंबात १९६६ साली पौर्णिमाताईंचा जन्म झाला. माहेरी ४५ एकर शेती. मात्र, डब्बा पार्टीपुरता शेताचा आणि ताईंचा संबंध. मुलींनी शेतात काम करू नये, असे वडिलांचे नेहमी सांगणे. दोन भाऊ शेती कसत. २ जून १९८५ मध्ये त्यांचा विवाह टाकरखेडा, ता. भातकुली, जि. अमरावती येथील विजयराव सवई यांच्याशी झाला. सासरी ३६ एकर शेती. मात्र, सर्व शेती कोरडवाहू. एवढ्या मोठ्या शेतीत एक एकर क्षेत्रही ओलिताखाली नसावे हे त्यांच्या मनाला सतत बोचत असे. त्यांनी शेतात विहीर खोदली व बोअरवेल घेतले. आज ३६ एकर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी सिंचनक्षमता त्यांनी विकसित केली आहे.

विदेशात कमीत कमी वयात पदवीधर झाल्याचे उदाहरण आपण बर्‍याचवेळा ऐकतो. आपल्या देशात ज्या वयात १२ वी होते त्या वयात पदवीधर झाल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकी. मात्र, या उदाहरणांमध्ये पौर्णिमाताई येतात. वयाच्या तिसर्‍या वर्षातच शाळेत घातल्यामुळे ताई वयाच्या १८ व्या वर्षी वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्या. बी. कॉम.च्या अंतिम वर्षाला असतानाच ताईंचे लग्न झाले. तरीही त्यांनी आपला कमी वयात शिक्षण घेण्याचा नाद सोडला नाही. त्यांनी लग्नानंतर अर्थशास्त्रात एम. ए. केले. शिक्षिका होण्याचे शिक्षण घे, असे नेहमी सांगणे होते. मात्र, त्यांना वेगळ्याच विषयात करिअर करायचे होते. सासरी असताना ताईंनी बी.एड. प्रवेशासाठी प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केले. आज त्या शेतीचे अर्थशास्त्र व्यवस्थितपणे हाताळतात.

शेतीशाळेमुळे आयुष्याला कलाटणी
२००२ मध्ये कृषी विभागाच्या शेतीशाळेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या शेतीशाळेत रेशीम शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात येत होते. शेतीशाळेच्या मार्गदर्शक सीमा देशमुख यांनी पौर्णिमाताईंची झोकून देण्याची तयारी पाहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. कृषी विभागाने रेशीम शेतीसाठी त्यांच्या गावातील दहा शेतकरी निवडले. मात्र, त्यापैकी तीनच शेतकरी तयार झाले. या तीनपैकी केवळ पौर्णिमाताईंनी रेशीम शेतीत रस दाखविला. २००६ मध्ये कृषी विभागाने दिलेल्या तुती रोपांची दोन एकर शेतात लागवड केली. अंडीपुंज मिळाल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे व्यवस्थित लक्ष दिले. चार वर्षांपासून त्या रेशीम शेती करीत असून, गतवर्षी त्यांना १ लाख ८६ हजारांचे उत्पन्न झाले. खर्च वगळता त्यांना १ लाख ४८ हजार रुपये निव्वळ नफा झाला. यावर्षी आतापर्यंत चार पिके त्यांनी घेतली असून, त्यांना ८४ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांना मजुरीपोटी १० हजार रुपये खर्च आला. पाला गोळा करणे, अंडीपुंज सोडणे, रेशीम निघाल्यानंतर ते स्वच्छ करणे, पॅकिंग करणे आदी कामे त्या केवळ दोन ते तीन मजुरांच्या भरवशावर करतात.

गांडूळ खताचा प्रकल्प
पौर्णिमाताईंनी केवळ पीकपद्धतीत बदल करून आधुनिक शेती केली नाही, तर २००५ मध्ये गांडूळ खतप्रकल्प सुरू करून शेतीला जोडधंद्याची ‘जोड’ दिली. उच्चप्रतीचे गांडूळ आणून ताईंनी केवळ त्यांच्या शेतापुरता प्रकल्प राबविला. मात्र, उत्कृष्ट व्यवस्थापनातून त्या गांडूळ खतही विकतात. यावर्षी त्यांनी चार बाय अडीच आकाराचे १२ बेड तयार केले असून, एका बेडमध्ये १० किलो गांडूळ टाकून उत्कृष्ट खत त्या तयार करत आहेत. यंदा त्यांना एक हजार प्रतिक्विंटलप्रमाणे ऑर्डरही मिळाल्या आहेत. गतवर्षी त्यांनी ३०० क्विंटल खताची व ८०० रुपये किलो दराने गांडूळाची विक्री केली.

सेंद्रिय शेतीवर भर
शेतीशाळेतील मार्गदर्शन ऐकल्यानंतर पौर्णिमाताईंनी संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करायचे ठरविले. आज त्या शेतात गांडूळ खत, शेण खत, हिरवळीचे खत टाकतात. गेल्या कैक वर्षांपासून त्यांनी शेतात रासायनिक खतांचा एक दाणाही टाकला नाही. सोयाबीन, हरभरा, तीळ किंवा कापूस असो, सर्व पिकेत्या सेंद्रिय पद्धतीने घेतात. तसेच सेंद्रिय शेतीचा प्रसारही करतात. वेगवेगळ्या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांतून त्या सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देतात. रेशीम किड्यांची विष्टाही खत म्हणून वापरतात. ही १० किलो विष्टा ४० किलो युरियाचे काम करते, असेही त्या अनुभवातून ठासून सांगतात.

टाकाऊपासून टिकाऊ
रेशीमचे उत्पादन घेतल्यानंतर शिल्लक राहिलेले रेशीम कोष फेकून दिले जातात. त्यामध्ये अळी असल्यास ती मारून त्याचा कचरा केला जातो. मात्र, पौर्णिमाताईंनी या कोषापासून आकर्षक हार तयार केले असून, अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. केवळ रेशीम कोषच नाही, तर कापूस काढल्यानंतर सुकलेली बोंडे, गवत यांचा उपयोग करून त्यांनी सुंदर कुरडी बनविली आहे. तसेच रेशीम कोषांपासून हुबेहूब गुलाबाची वाटणारी रंगीबेरंगी फुलेही बनविली आहेत. केवळ रेशीम घेऊन भागणार नाही, तर आकर्षक हार व फुले बनवून रेशीम कोषांपासून उत्पन्न मिळविता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

बचतगटाचा फुलविला संसार
त्यांनी टाकरखेडा येथे महिला बचतगट स्थापन केला असून, या बचतगटाच्या माध्यमातून २००५ ते २००९ पर्यंत माय मंजुळा माता दूध उत्पादक संघही चालविला. गावातील दूध गोळा करून ते सहकारी दूध डेअरीला विकायचे, असे काम हा बचतगट करायचा. पौर्णिमाताईंनी गावात कृषी विज्ञान मंडळ, महिला शेतकरी मंडळही स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध शेती मार्गदर्शन व धार्मिक कार्यक्रम घेतले. दर एकादशीला गावात महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून त्या चालू सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात.

राजकारणातही ठसा
पौर्णिमाताईंनी केवळ शेतीतच नाही, तर राजकारणातही ठसा उमटविला आहे. १९९५ ते २००० या कालावधीत त्या टाकरखेडा (संभू) गावाच्या ग्रामपंचायत सदस्या, तर २००२ मध्ये भातकुली पंचायत समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या प्रचाराचा नारळ त्या स्वत:च फोडत व सर्व भाषणे त्याच देत, मात्र, आता त्यांनी राजकारण सोडले आहे.

घरीच थाटले कृषी ग्रंथालय
ताईंना वाचनाची प्रचंड आवड. त्यातही कृषिविषयक साहित्याची जास्तच. त्यामुळे त्यांनी घरीच कृषी ग्रंथालय साकारले आहे. त्यांच्या ग्रंथालयात ७०० पुस्तके आहेत. दररोज एक ते दीड तास त्या ग्रंथालयात असतात. शेती विषयावरील कुठलेही पुस्तक असो ते ताईंच्या ग्रंथालयात असतेच.

पौर्णिमाताईंचा गौरव
पौर्णिमाताईंना २००६ साली राज्य शासनाचा राष्ट्रमाता जिजाऊ कृषिभूषण पुरस्कार, २००६ चा वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा शेतीनिष्ठ पुरस्कार, २००८ मध्ये शेतकरी एकता मंच (वर्धा) चा कृषिभूषण पुरस्कार, २००९ चा लक्षाधीश रेशीम शेतकरी पुरस्कार, २००८ मध्ये राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझरचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.*

- नीलेश तायडे/अमरावती

Read More →

ज्या काळात डोक्यावरचा पदर पडू न देण्याची परंपरा होती, त्या काळात परंपरेला छेद देऊन खंबीर शेतकरी म्हणून उभ्या राहिलेल्या शारदा मोरे यांचे कर्तृत्व कौतुकास्पदच आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील रहिवासी असलेल्या शारदाताईंनी लग्नानंतर शेती व्यवसायाशी समरस होत नियोजनबद्धरीतीने द्राक्ष, डाळिंब व चिकूची शेती फुलवली आहे. पारंपरिक पद्धतीची शेती सोडून त्यांनी आधुनिकतेची कास धरत शेतीत नवनवीन प्रयोग केले.
एक प्रगतिशील महिला शेतकरी, अशी नवी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

Read More →

दुसर्‍याच्या शेतात मजुरी करण्यापासून ते स्वत:ची शेती संपन्न करण्यापर्यंतचा जयाबाई पवार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रचंड कष्ट आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर केवळ अडीच एकर शेतीतून लक्षाधीश बनण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे.

Read More →

अहमदनगर : राज्यातील १९ जिल्ह्यांतील ५० आदर्श गावांची निवड केल्यानंतर त्या गावांत जलसंधारणाची मोठी कामे करण्यात आली आहेत. या गावांत १० कोटी १० लाखांचा निधी वितरित करण्यात आला असून, ६ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाला आहे.

Read More →

डोंगररांगांनी वेढलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड परिसरातील खडकाळ जमिनीत पिकं फारशी येत नसल्याने अनेक शेतकरी केवळ खरीप पिकांचेच उत्पादन घेतात. तथापि, हिवरखेडच्याच दादाराव हटकर व बंधूंनी मात्र जेथे कुसळ उगवत नव्हती अशा माळरानावर जिद्द, चिकाटी व कष्टाच्या बळावर संत्रा, डाळिंबाची बाग फुलविली आहे. शेततळ्यातील पाण्याचे गुरुत्वाकर्षण पद्धतीने उत्तमप्रकारे सिंचन व नियोजन करून त्यांनी फळबागेसह शेतात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत.

Read More →

देवळाली प्रवरा (जि. अहमदनगर) येथील गणेश बाळासाहेब भांड या युवकाने शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने दूध संकलन करण्याचे ठरविले. हे करत असताना स्वत:च्या मालकीचा दूध प्रकल्प असावा, असे स्वप्न पाहिले आणि खडतर परिस्थितीशी संघर्ष करीत अथक प्रयत्नांतून स्वत:च्या शेतवस्तीवर ‘चैतन्य मिल्क ऍण्ड ऍग्रो फार्म’ नावाने हा दूध प्रकल्प सुरूही केला.

Read More →

पुणे : यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला पाणी मिळवणे हा शेतकर्‍यांसमोरची प्रमुख समस्या आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथील शेतकर्‍यांनी गावातील ओढ्यावरच दोन साठवण तलाव बांधले आहेत. सध्या या तलावात पाणी साठले असुन पाण्याने ङ्गुगवटा धरला आहे. पाण्याविणा जगणे कठीण आहे हे येथील शेतकर्‍यांनी ओळखले होते. पाण्याचा मुबलक स्त्रोत निर्माण करुन वरवंड मधील शेतकर्‍यांनी शेतीसाठी लागणर्‍या
पाण्याची समस्येवर साठवण बंधार्‍याच्या माध्यमातुन सुटका करुन घेतली आहे.

Read More →